दिल्ली: बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानात घुसून एअरस्ट्राईक केला आहे. इंडियन एअर फोर्सने ९ दहशतवादी तळांना टार्गेट केलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य बिथरलं आहे. त्यांनी भारतीय सीमेवर गोळीबार करायला सुरुवात केली. भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला ताजा असताना आता आणखी एक आर्मी पाकिस्तानविरोधात अॅक्टीव्ह झाली आहे. पाकिस्तानमध्ये बीएलए अर्थात बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यासोबत रक्तरंजित होळी खेळली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने बोलनच्या मच कुंड भागात गस्तीवर असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर रिमोट-कंट्रोलच्या मदतीने आयईडीने हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे १२ सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.
भारताने केलेला एअरस्ट्राईक ताजा असताना बलुच लिबरेशन आर्मीने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरलं आहे. खरं तर, गेल्या काही काळापासून बलुचिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तानसोबत मोठा संघर्ष करत आहे. पाकिस्तानने अनेकदा बीएलएला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आर्मी अद्याप बलुचिस्तानमध्ये तग धरून आहे. भारताने हल्ला केल्यानंतर या बीएलएने देखील पाकिस्तानवर हल्ला केला. ज्यात पाकिस्तानचे १२ सैनिक मारले गेले.
हा हल्ला कधी झाला?
७ मे २०२५ रोजी शोरकंद परिसरात पाकिस्तानी सैन्याचा ताफा गस्तीवर होता. हा ताफा बोलनच्या मच कुंड भागात आला असता बलुच लिबरेशन आर्मीने या ताफ्याला टार्गेट केलं. हा हल्ला करण्यासाठी बीएलने खास टेक्नॉलॉजीचा वापर केला. रिमोट कन्ट्रोलच्या मदतीने स्फोट घडवून आणला. बीएलएच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने (एसटीओएस) प्रत्यक्षात हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि त्यात असलेले सर्व सैनिक ठार झाले.
बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून अशांतता
गेल्या अनेक वर्षांपासून बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले करत आहे आणि त्यांचे मोठे नुकसान करत आहे. मार्चमध्ये, क्वेट्टाहून पेशावरला जाफर एक्सप्रेसचे बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या सदस्यांनी अपहरण केले होते. यामध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक मारले होते. गेल्या दोन दशकांपासून तिथे अशांतता आहे आणि सतत हल्ले होत आहेत. स्थानिक बलुच नेत्यांचा आरोप आहे की देशाचे संघराज्य सरकार बलुचिस्तानच्या मौल्यवान खनिज संपत्तीचे शोषण करत आहे आणि त्यांना दुय्यम दर्जाचे राष्ट्र म्हणून वागवत आहे.