”वकिलीचा दुरुपयोग, गावकऱ्यांनी मारहाण केलीच नाही” बीड प्रकरणात गावच्या महिला सरसावल्या

0

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील एका गावामध्ये वकील असलेल्या महिलेला अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली. पीडितेने केलेल्या आरोपांनुसार गावातल्या १० जणांनी तिला शेतात मारहाण केली.मात्र गावातील काही महिला आणि पुरुषांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या वकील असण्याचा दुरुपयोग करते आहे.

नेमकं घडलं काय?

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे. महिला सरपंच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण केली, असा पीडितेचा आरोप आहे. ही मारहाण इतकी बेदम होती की, वकील महिलेच्या पाठीवर अन् अंगावर काळे-निळे व्रण पडले आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पीडितेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळं मायग्रेनचा त्रास होत असल्यानं आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, तसंच आपल्या घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. त्याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या महिलेला मारहाण केल्यानं याप्रकरणी आरोपींवर कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी होत आहे.

”गावकऱ्यांनी मारहाण केलीच नाही”

सरपंच आणि इतर दहा जणांनी मारहाण केल्याचा आरोप असला तरी गावातल्या काही महिला आणि पुरुष मंडळींनी आरोप फेटाळून लावले आहेत. गावातल्या महिला म्हणतात, ही महिला वकिली शिकून आल्याने कायद्याचा गैरवापर करते आहेत. गिरणी बंद करावी म्हणून तक्रारी देते. गावात धार्मिक कार्यक्रम करु देत नाही.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

काही पुरुष मंडळींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, गावात अनेकांवर या महिलेने खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. कायद्याचा अभ्यास असल्याने वाट्टेल तसं ती वागत आहे. तिला गावातल्या लोकांनी मारहाण केलेली नाही. त्यांच्या घरातल्या भांडणामुळे तिला मारहाण झाली असेल. परंतु तिने केलेले सगळे आरोप खोटे आहेत. अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना व्यक्त केली.