देशभरातील ३९०० स्टार्टअपमध्ये बारामतीच्या उद्योजकाचा अव्वल स्टार्टअप ठरला; १० लाख रुपयांचे अनुदानही मंजूर

0

युवा उद्योजक अनिकेत गोरख मिंड यास राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप महारथी चॅलेंज स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. ॲग्रिटेक विभागात राष्ट्रीय स्तरावर त्याच्या स्टार्टअपने केलेल्या कामगिरीचे कौतुक झाले असून, त्याच्या कामासाठी १० लाख रुपयांचे अनुदानही मंजूर झाले आहे.दिल्लीत आयोजित या स्पर्धेत देशभरातून ३९०० स्टार्टअप यात सहभागी झाले होते. दिल्लीतील कार्यक्रमात वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले.

शेतकरी कुटुंबातून आलेला व मजुरीमध्ये अधिक खर्च होतो, हे अनुभवलेल्या अनिकेतने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी किमतीची अवजारे बनविण्याचा निर्णय घेतला. अनिकेतने स्पार्क ॲग्रो या नावाने बारामती एमआयडीसीमध्ये वर्ष २०१९मध्ये मिंड याने स्टार्ट अप सुरू केला होता.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

ही कंपनी पॉवर टिलर, पॉवर वीडर, स्प्रे पंप्स आणि विविध शेती उपयोगी यंत्रांचे उत्पादन व वितरण करते. कंपनीने अल्पावधीतच शॉपिफाय स्टोअरच्या माध्यमातून भारतभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची किमया साध्य केली आहे.

स्टार्टअप सुरू केला आणि कोविडचे संकट आले. त्या काळात त्यालाही अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र चिकाटी आणि नवसंकल्पनांच्या जोरावर आणि ग्रामीण भागातच बालपण गेले असल्याने शेतीचा अभ्यास खोलवर होता.

त्यामुळे त्याने शेती अवजारांच्या क्षेत्रात स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला व यामध्ये त्याला चांगले यश मिळाले. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार व टिकाऊ यंत्र उपलब्ध करून देण्याचे त्याचे ध्येय आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

यामुळे स्पार्क ॲग्रोची स्थापना

बारामती तालुक्यातील होळ गावचा हा सुपुत्र, पुण्यात मॅकेनिकल इंजिनिअर झाल्यानंतर मोटर स्पोर्ट्स कंपनी सुरू केली; पण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी असल्याने कालांतराने त्याने स्पार्क ॲग्रोची स्थापना केली. आज त्याच्या स्टार्टअपमधून डझनभर युवकांनाही रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.