भगवान महावीर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नवकार महामंत्र दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात या नवकार महामंत्राचा जप करण्यता आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनीही नवकार मंत्राचा जप केला. महावीर जयंतीला जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने 108 देशाचे लोक या उत्सवात सामील होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात अत्यंत श्रद्धा भावनेने पोहोचले. कार्यक्रमात ते अनवाणीच आले. डायसवर न बसता लोकांमध्ये बसले. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी नवकार महामंत्राच्या अध्यात्मिक शक्तीची मला अजूनही माझ्यात जाणीव होत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
काही वर्षापूर्वी बंगळुरू येथे अशाच एका सामुहिक मंत्रोच्चाराचा मी साक्षी बनलो होतो. आज मला तीच अनुभूती येत आहे. तेच गहिरेपण जाणवत आहे. नवकार मंत्र केवळ मंत्र नाहीये. हे आपल्या आस्थेचं केंद्र आहे. आपल्या जीवनाचा मूळ स्वर आणि त्याचं महत्त्व केवळ अध्यात्मिक नाहीये. स्वत:पासून समाजापर्यंत सर्वांना मार्ग दाखवणारा हा महामंत्र आहे. जनापासून जगाचा हा प्रवास आहे. या मंत्राचं प्रत्येक कडव नव्हे तर प्रत्येक अक्षर हे एक मंत्रच आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
अन् मोदी अनवाणी आले
नवकार महामंत्रात मोदी आले. पण त्यांच्या फोटोतून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत आहे. ती म्हणजे मोदी भारतीय संस्कृतीचा प्रचंड आदर करत असल्याचं दिसून येत आहे. मोदी नवकार महामंत्रात सामील झाले. पण श्रद्धेचं प्रतिक म्हणून ते कार्यक्रमात अनवाणीच आले होते. मोदी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या पायात बुट नव्हते. केवळ सफेद रंगाचे मोजे पायात होते. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी डायस असतानाही मोदी डायसवर बसले नाहीत. ते लोकांमध्ये जमिनीवर भारतीय बैठक मारून बसले.
स्वत:वर विश्वास ठेवा
स्वत:वर विश्वास ठेवा असं नवकार महामंत्र सांगतो. स्वयंचा प्रवास सुरू करा. शत्रू बाहेर नाहीत. आपल्याच आत असतात. नवकार महामंत्र नकारात्मक विचाराला दूर करतो. अविश्वासाला दूर करतो. तसेच स्वार्थच खरा दुश्मन आहे हे सांगतो. त्यावर मात करणं हाच खरा विजय आहे. त्यामुळेच जैन धर्म बाहेरचं जग नव्हे तर आपल्या आतलं जग जिंकण्याची प्रेरणा देतो, असंही मोदी म्हणाले.
नवकार महामंत्र एक मार्ग
नवकार महामंत्र एक मार्ग आहे. हा मार्ग मानवाला शुद्ध करतो. मानवाला सौहार्दाचा मार्ग दाखवतो. नवकार मंत्र खऱ्या अर्थाने मानव, ध्यान, साधना आणि आत्मशुद्धीचा मंत्र आहे. जीवनाचे नऊ तत्त्वे आहेत हे आपल्याला माहीत आहे. हे नऊ तत्त्व आयुष्याला यशाकडे घेऊन जातात. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत नऊला विशेष महत्त्व आहे. नवकार महामंत्राचं हे दर्शन विकसित भारताच्या व्हिजनशी जोडलं जातंय. मी लालकिल्यावरून म्हणालो होतो की, भारत म्हणजे विकास आणि वारसा आहे. एक असा भारत, जो थांबणार नाही. तो ऊंच शिखरं गाठेल, पण आपलं मूळ विसरणार नाही. विकसित भारत आपली संस्कृती जपेल. त्यामुळेच आपण तीर्थंकराच्या शिकवणी अंमलात आणत असतो, असंही त्यांनी सांगितलं.
मोदींनी दिले नऊ संकल्प
आज एवढ्या मोठ्या संख्येने जगभरात नवकार महामंत्राचा जप केला जात आहे. आपण जिथेही असू तिथे नऊ संकल्प केले पाहिजे. या नऊ संकल्पाने आपल्याला नवीन ऊर्जा मिळेल, ही माझी गॅरंटी आहे, असंही त्यांनी सांगतिलं.
पहिला संकल्प – पाणी वाचवा
दुसरा संकल्प – एक झाड आईच्या नावे लावा
तिसरा संकल्प – स्वच्छतेचं मिशन
चौथा संकल्प – व्होकल फॉर लोकल
पाचवा संकल्प – देश दर्शन
सहावा संकल्प – नैसर्गिक शेतीचा स्वीकार करा
सातवा संकल्प – हेल्दी लाइफस्टाइल सुरू करा
आठवा संकल्प – योग आणि खेळाला जीवनात स्थान द्या
नववा संकल्प – गरीबांना मदत करा
ज्ञान भारत मिशन काय आहे?
जेव्हा भगवान महावीर यांच्या 2550व्या निर्वाण महोत्सवाची वेळ आली तेव्हा आम्ही देशभरात हा उत्सव साजरा केला. जेव्हा प्राचीन मूर्त्या विदेशातून भारतात येतात तेव्हा आपल्या तीर्थंकराच्या मूर्त्याही येतात. जैन धर्माचं साहित्य भारताच्या बौद्धिकतेचा कणा आहे. हे ज्ञान जतन करणं आपलं कर्तव्य आहे, असं त्यांनी सांगितलं.
त्यामुळे आपण प्राकृत आणि पालीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ज्ञान भारतम मिशन सुरू करण्याची माहितीही त्यांनी दिली. दुर्देवाने अनेक महत्त्वाचे ग्रंथ हळूहळू लोप पावले. त्यामुळेच आपण ज्ञान भारत मिशन सुरू केलं आहे. यंदा बजेटमध्ये त्याची घोषणा केली आहे. देशातील कोट्यवधी पांडुलिपींचा सर्व्हे करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्राचीन वारश्याला डिजीटल करून आम्ही त्याला आधुनिकतेशी जोडू. हे मिशन एक अमृत संकल्प आहे. नवीन भारत AI द्वारे शक्यता शोधेल आणि अध्यात्माने जगाला मार्ग दाखवेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.