पवार देणार उद्धव ठाकरेंना दणका; विधानसभेचा उमेदवारच मशाल सोडणार

0
1

कोकणातील दिग्गज नेत्यांच्या हाती धनुष्यबाण देत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दणका दिलेला असतानाच, आता अजित पवारांनी रायगडात हादरे देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवणारा उमेदवारच राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला आहे.या महिला नेत्याचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

विधानसभा निवडणुकीपासूनच रायगडचं राजकारण तापलेलं आहे. आधी उमेदवार निश्चिती आणि त्यानंतर तिकीट वाटप यामुळं चर्चेत असलेला रायगड जिल्हा पालकमंत्रिपदाच्या निवडीमुळं राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला. शिवसेनेचे गोगावले आणि राष्ट्रवादीच्या तटकरे यांच्यामुळं या जिल्ह्याचं पालकमंत्रिपदच रद्द करावं लागलं. आता पुन्हा एकदा रायगडचं राजकारण चर्चेत आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप या आता मशाल सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाताला बांधणार आहेत.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

सुतारवाडीत शिक्कामोर्तब

स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटाकडून महाड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. जगताप या पराभूत झाल्या होत्या. आता त्याच स्नेहल जगताप आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. सुतारवाडी येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयात त्यावर शिक्कामोर्तब झालंय.

या कार्यालयात बंद दाराआड दोन तास बैठक झाल्याचं कळतं. या बैठकीला माजी आमदार अनिकेत तटकरेही उपस्थित होते. स्नेहल जगताप यांचे काका नाना जगताप यांच्यासह भाऊ श्रेयस जगताप आणि महाड, पोलादपूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असल्याचे सांगितले जाते.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

या महत्त्वपूर्ण बैठकीत सुनील तटकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोबाइलवरून फोन करत संभाषण घडवून आणलं. येत्या काही दिवसांत पक्षप्रवेशासाठी मुहूर्त ठरवण्यात येणार आहे. महाड येथे एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे कळते. रायगडच्या राजकारणात सध्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला आहे. त्यातच मंत्री भरत गोगावले व खासदार सुनील तटकरे यांच्यातून विस्तव जात नसल्याने जगताप यांच्या प्रवेशाने तटकरे यांनी गोगावले यांना राजकारणात शह दिल्याचे बोलले जात आहे.