पुणे मेट्रोच्या नव्या पर्वाला सुरुवात! २५ किमी लांब मार्ग अन् २२ नवी स्थानके, कसा आहे प्लॅन? वाचा

0
2

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्पातील खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी ‘रचनाकार सल्लागार समिती’साठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पहिल्या टप्प्यातील मार्गांचा विस्तार अंतिम टप्प्यात असताना दुसऱ्या टप्प्यातील पाच मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या २५.५१ किमी मार्गावर एकूण २२ स्थानके असतील. तर दुसऱ्या बाजूला नळ स्टॉप, वारजे, माणिकबाग या ६.१३ किमी मार्गावर ६ स्थानके असतील. या दोन्ही मार्गांवरील स्थानकांची रचना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून आणि इतर दळणवळण यंत्रणा परिस्थितीनुरूप सुनिश्चित करण्यासाठी ‘मेट्रो’ने खासगी रचनाकार सल्लागार समितीची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

खडकवासला-खराडी मार्ग (२५.५१ किलोमीटर २२ स्थानके)

खडकवासला, दळवेवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, देशपांडे उद्यान, स्वारगेट (उत्तर), सेव्हन लव्हज चौक, पुणे कटक मंडळ, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर फाटा, मगरपट्टा (दक्षिण), मगरपट्टा मध्य, मगरपट्टा (उत्तर), हडपसर रेल्वे स्थानक, साईनाथनगर, खराडी चौक आणि खराडी बायपास अशी २२ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत.

नळ स्टॉप ते वारजे माणिकबाग (६.१२ कि.मी. ६ स्थानके)

माणिकबाग, दौलतनगर, वारजे, डहाणूकर कॉलनी, कर्वे पुतळा आणि नळ स्टॉप ही ६ स्थानके आहेत.

स्थानकांमधील रचना

परिसरानुसार स्थानकाची रचना, प्रवाशांना सहज आणि सुलभ प्रवास करण्यासाठी सुविधा, वातानुकूलित यंत्रणा, स्थानकावरील विद्युत आणि सौर यंत्रणांची सुविधा, अग्निसुरक्षेपासून हरित इमारतीच्या दृष्टीने नैसर्गिक स्त्रोतांचा पुरेपूर वापर, स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, वस्तू विक्री दुकाने, ध्वनियंत्रणा आणि इतर मानकांनुसार देखभाल दुरुस्ती आदींचा विचार करून अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कंपनीची नियुक्ती असणार आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली