पुणे : उद्धव ठाकरे यांनीच तत्कालिन मंत्री संजय राठोड यांना क्लिनचिट दिली, असा दावा करून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेरण्याचा प्रयत्न केला. हिम्मत असेल तर राठोड यांच्या क्लिनचिटवरून उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारा, असे आव्हानही चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना दिले. चित्रा वाघ यांच्या ठाकरे आणि परब यांच्यावरील टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांच्यावरील आरोप आणि तत्कालिन कारवाई तसेच ठाकरे यांची क्लिनचिट यावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांना चांगलेच कोंडीत पकडले.
अंधारे म्हणाल्या, जर उद्धव ठाकरे यांच्या क्लिनचिटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांना मंत्री केले असेल तर चित्रा वाघ यांचे नेते फडणवीस हे खरे असतील… आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की चित्रा वाघ या भटक्या विमुक्त प्रवर्गातील एका नेत्याचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करीत होत्या. तसेच स्वत:च्या राजकीय कारकीर्दीसाठी भटक्या विमुक्त समाजातील पोरीच्या अब्रूचे मातेरे करीत होत्या.
आणि समजा जर उद्धव ठाकरे यांनी दिलेली क्लिनचिट चूक असेल तर चित्रा वाघ यांनी कसला लढा लढला? त्यांच्याविरोधात लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्वासह राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारायला पाहिजे होती. भाजपनेही संजय राठोड यांची केस पुन्हा एकदा चौकशीसाठी घेतली केली पाहिजे. ज्याअर्थी फडणवीसांनी त्यांना मंत्री केले, त्याअर्थी ती क्लिनचिट योग्य होती, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
अनिल परब यांनी मंत्री संजय राठोड यांच्या केसचे काय झाले? सत्ताधारी पक्षातील महिला आमदार आता का शांत आहेत? असा सवाल विचारल्याने चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या. मी माझा लढा लढले. हे करीत असताना माझ्या कुटुंबियांना अतोनात त्रास झाला, तरीही लढाई सोडली नाही. तुमच्याच नेत्याला (उद्धव ठाकरे) राठोड यांना क्लिनचिट का दिली, हे हिम्मत असेल तर त्यांना विचारा, असे आव्हान देत तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते, अशा आक्रमक अंदाजात चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना उत्तर दिले.