ते फोटो पाहून शब्दच फुटत नाहीत, त्या कुटुंबाचं काय होत असेल ? बजरंग सोनावणे यांचा उद्विग्न सवाल

0
9

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास तीन महिने होत आले आहेत. 9 डिसेंबर रोजी त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या मुद्यावरून गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील वातावरण अतिशय तापलेलं असून काल रात्री एक महत्वाची घडामोड घडली. संतोष देशमुख यांच्या हत्येचा एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अत्यंत निर्दयीपणे आरोपींनी त्यांची हत्या केली आणि त्यानंतरही तके हसत होते. हे भीषण फोटो पाहून कोणाच्याही काळजाचं पाणी होईल. मात्र हे व्हिडीओ समोर आल्यामुळे आता राजकीय घडामोडींनाही वेग आला असून काल रात्री देवगिरी बंगल्यावर एक महत्वाची बैठक पार पडली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली असून आज थोड्याच वेलात धनंजय मुडे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्त करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

बजरंग सोनावणेंचा उद्विग्न सवाल

संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळावा, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी धरून लावणारे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधत या सर्व मुद्यावर त्यांची भूमिका मांडली. ” मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितलं, हे मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे. पण कशामुळे एवढा वेळ लागतोय ? याचं उत्तर दिलं पाहिजे. इतकं वाईट कृत्य होऊ आता इतके दिवस उलटून गेलेत , तरी आत्तापर्यंत राजीनामा का घेतला गेला नाही ? ” असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला. ” कुठल्या मंत्र्यांना मंत्रीमंडळात ठेवायचं किंवा बडतर्फ करायचं याचा अधिकार त्यांना ( मुख्यमंत्री) आहे. तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो, याच्यावर त्याच्यावर ढकलाढकली न करता त्यांनी निर्णय लवकर घ्यायला पाहिजे. तरचं हे लोकं काहीतरी करत आहेत असं बीड जिल्ह्यातील जनतेला वाटेल. माणुसकीला काळिमा फासणारी एवढी भीषण घटना आमच्या जिल्ह्यात घडली, ते फोटो पाहून तोंडातून शब्दसुद्धा उच्चारता येत नाहीयेत, आम्हालाही काळजात काही होतंय, मग त्या कुटुंबाचं काय होत असेल ? ” असा सवाल उपस्थित करत सोनावणे यांनी सरकारला जाब विचारला आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

नीतीमत्ता तर नाहीच पण संवेदनशीलताही नसावी ?

त्या मुलीने, त्या भावाने, त्या आईने काय करावं ? एवढी घटना घडूनही जर त्यांच्याकडे नीतीमत्ता तर नाहीच पण संवेदनशीलताही त्यांच्याकडे नसेल तर या लोकांना , राजकारण्यांना काय करायचं ? असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या एवढ्या जनतेचे हाल होत असतील, तर या राजकारणी मंडळींनी स्वत:साठी करायचं आणि जनतेसाठी काहीच करायचं नाही असा त्यांचा उद्देश दिसतोय, अशी टीकाही त्यांनी केली. माझ्याकडेल बोलण्यासारखे शब्दच नाहीत आता, असं सोनावणे म्हणाले.