भारतीय संघाने पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानला धूळ चारण्याची परंपरा कायम ठेवली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात यजमान पाकिस्तान संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला.
भारतीय संघाने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयाची नोंद केली आहे. या विजयासह पाकिस्तानचा संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर दुसरीकडे सलग २ सामने जिंकूनही भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकलेला नाही. दरम्यान कसं असेल भारतीय संघासाठी समीकरण? जाणून घ्या….
कसं आहे पॉईंट्स टेबल?
भारतीस संघाने आतापर्यंत सलग २ सामने जिंकले आहेत. मात्र अजूनही भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळू शकलेलं नाही. भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता खूप कमी आहे. पण, क्रिकेटमध्ये कधी काय होईल, याचा काही नेम नसतो. संपूर्ण समीकरण समजून घ्या. सलग २ सामने जिंकून ४ गुणांसह भारताचा संघ अव्वल स्थानी आहे. तर १ सामना जिंकलेला न्यूझीलंडचा संघ २ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानी आणि पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानी आहे.
सेमीफायनलच्या समीकरणाबाबत बोलायचं झालं, तर सलग २ सामने जिंकून भारताने सेमीफायनलचं तिकीट जवळजवळ निश्चित केलं आहे. मात्र अजूनही साखळी फेरीतील ३ सामने शिल्लक आहेत. पुढील सामना न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या सामन्यात जर बांगलादेशने बाजी मारली.
तर हा संघ २ गुणांची कमाई करेल. बांगलादेशचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. जर बांगलादेशने हा सामनाही जिंकला, तर बांगलादेश ४ गुणांची कमाई करेल. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा शेवटचा सामना भारतीय संघाविरुद्ध होणार आहे. जर न्यूझीलंडने या सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला, तर न्यूझीलंडचेही ४ गुण होतील.
असं जर घडलं, तर तिन्ही संघ ४-४ गुणांच्या बरोबरीला येतील. असं झाल्यास नेट रनरेटमध्ये आघाडीवर असलेला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. नेट रन रेटच्या बाबतीत, बांगलादेशचा संघ सर्वात मागे आहे. बांगलादेशचा नेट रनरेट -०.४०८ इतका आहे. तर भारतीय संघाचा नेट रनरेट ०.६४७ आङे. तर न्यूझीलंडचा संघ १.२०० इतका आहे. जर भारतीय संघ शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत झाला, तर सेमीफायनलमध्ये जाणं कठीण होऊन जाईल.