”माझ्याकडे असे पुरावे आहेत, ज्यामुळे मोठमोठ्या गोष्टींचा छडा लागणार” एसपींच्या भेटीनंतर धनंजय देशमुख काय म्हणाले?

0
1

मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यावेळी धनंजय यांच्यासोबत मस्साजोगच्या गावकऱ्यांचं एक शिष्टमंडळ होतं. साधारण तास-दीड तास एसपींसोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली. मंगळवारपासून गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरु होणार आहे, त्याबाबत रात्रीच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले.

पोलिस अधीक्षक नवनीत कॉवर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या तीन दिवस अगोदर आणि नवीन एसपी कॉवत साहेब जॉईन होण्याच्या पूर्वी म्हणजे २१ डिसेंबरपर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्या मी एसपी साहेबांच्या कानावर घातल्या आहेत. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे आणि २८ तारखेला सगळं लेखी स्वरुपात मी देणार आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

धनंजय देशमुख पुढे म्हणाले की, माझ्याकडे असे पुरावे आहेत, की ते नाही मान्य करायची वेळ आली तरी मान्य करावेच लागतील. सीसीटीव्ही, डीव्हीआर.. आणखी भरपूर आहे. मी माझ्याकडे पुरावे ठेवत नव्हतो.. जे काम स्थानिक गुन्हे शाखेने करायला पाहिजे होते, ते काम आम्ही गावकरी करीत आहोत. या पुराव्यांमुळे मोठमोठ्या गोष्टींचा छडा लागणार आहे. आजपर्तंय कुठल्याच कागदावर आणि तपासामध्ये जे आलेलं नाही, ते मी २८ तारखेला देणार आहे.

”६ ते २१ डिसेंबरदरम्यान पोलिसांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. ८ तारखेला आरोपींसोबत चहापाणी झालं आहे. गुन्हा घडल्यानंतर जे करायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. आज मी एसपींसोबत चर्चा केली नसती तर हे पुढे आलं नसतं. त्यामुळे या प्रकरणाच्या पुर्नतपासणीची माझी मागणी आहे.”

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

”उद्यापासून सुरु होणाऱ्या आंदोलनाबाबत शिष्टमंडळ आणि गावकरी चर्चा करणार आहेत. आंदोलनासाठी पोलिसांनी वेळ मागितला आहे, परंतु तो निर्णय गावकरीच करणार आहेत. पोलिसांनी काय काय करायला पाहिजे होतं? का केलं नाही? लोकेशन का सांगितलं नाही? त्या दिवशी मी आरोपीवर विश्वास ठेवला नसता पण पीआय सांगत होते २० मिनिटात तुमचा भाऊ येईल.. म्हणून घात झाला.” असंही धनंजय देशमुख म्हणाले.

”हे कुठल्याच तपासामध्ये आलेलं नाही”

माझ्याकडे अशा गोष्टी आहेत, ज्या कुठल्याच तपासामध्ये आलेल्या नाहीत. ते मी २८ तारखेला सांगणार आहे. १० टक्के गोष्टी माझ्या मनामध्ये ठेवत आहे, त्याचे सगळे पुरावे मी देणार आहे. असं म्हणत धनंजय देशमुख यांनी चार दिवसांमध्ये सगळं जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे