दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची संधी कुणाला मिळणार याबद्दलचे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातायत. मात्र, अंतिम निर्णय भाजप हायकमांड घेणार आहे. वेगवेगळ्या घटकांनुसार, भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार आहेत. सध्या कोणीही उघडपणे आपला दावा करायला तयार नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. या यादीत, परवेश वर्मा यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा आहे.तसंच दावेदारांमध्ये अशी दोन नावे आहेत जी आमदारही नाहीत. मात्र, दिल्लीत भाजप धक्का देणार की परवेश वर्मा यांनाच संधी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.






अरविंद केजरीवाल यांना पराभूत करून मोठा गोंधळ उडवणारे परवेश वर्मा यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. परवेश दोनदा खासदार राहिले आहेत. नवी दिल्लीची जागा जिंकल्यानंतर परवेश वर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. दिल्ली ग्रामीणमध्ये मिळालेल्या प्रचंड यशामुळे परवेश वर्मा यांच्या नावाची चर्चा जास्त आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा निश्चित केलेला नव्हता. दिल्लीच्या निवडणुका पंतप्रधान मोदींच्या नावाने लढवल्या गेल्या. विजयानंतर आता सर्वांना मुख्यमंत्रिपदाच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे, भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार आहेत.
जर निवडून आलेल्या आमदारांव्यतिरिक्त मुख्यमंत्री निवडला गेला तर खासदार मनोज तिवारी आणि बांसुरी स्वराज हे देखील भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे असू शकतात. भाजप मोठ्या बहुमतानं सत्तेत आल्याने अशा परिस्थितीत दिल्लीचा विकास आणि सामाजिक समीकरणं लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल असं चित्र आहे.
रोहिणीमधून निवडणूक जिंकलेले विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांचंही नाव या शर्यतीत आहे. विजेंद्र हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. ते 2015 ते 2020 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. यानंतर रामवीर सिंह बिधुरी विरोधी पक्षनेते झाले. बिधुरी खासदार झाल्यानंतर विजेंद्र यांना पुन्हा विरोधी पक्षनेते बनवण्यात आले आहे. या यादीत सतीश उपाध्याय, जितेंद्र महाजन आणि अजय महावार यांची नावेही समाविष्ट आहेत.











