अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अनेक भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तर यात महाराष्ट्रासाठीही अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई आणि पुणे मेट्रोसाठी मोठी तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या एमयुटीपी-3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद केली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली. तसेच मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर दुसरीकडे मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी 57 लाख रुपये मिळणार आहेत.
ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी 652 कोटी 52 लाख रुपये मिळणार आहे. सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी 1094 कोटी 58 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला आहे. अर्थसंकल्पात विविध वस्तू-सेवांवरील सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे.