ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर बनण्यावरून अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत; “मी तिची नातेवाईक असते तर..”

0

नव्वदच्या दशकात बॉलिवूड गाजवलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या मार्गावर आहे. महाकुंभमध्ये तिने संन्यास घेतला. इतकंच नव्हे तर किन्नर अखाड्याची ती महामंडलेश्वर बनली आहे. यासाठी तिने स्वत:चं पिंडदान केलं आणि त्यानंतर तिचा पट्टाभिषेक पार पडला. ममताने अचानक हा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींनी तिचा विरोधसुद्धा केला आहे. ममता कुलकर्णीचा डी-कंपनीशी संबंध होता, मग तिला महामंडलेश्वर कसं बनवलं गेलं, असा प्रश्न काहींनी विचारला आहे. अशातच टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दिव्यांका म्हणाली, “हा तिचा निर्णय आहे. तिने स्वत:साठी असं आयुष्य निवडलं असेल तर खूपच छान आहे. समोरची व्यक्ती त्याच्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहे, त्याने काय सहन केलंय हे आपल्याला माहीत नसतं. त्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. जर मी तिची नातेवाईक असते तर मी काही बोलू शकले असते.”

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये ममताने शुक्रवारी 24 जानेवारी रोजी संन्यास घेतला. संन्यास घेण्यापूर्वी ममताने स्वत:चं पिंडदान केलं आणि त्यानंतर तिचा पट्टाभिषेक पार पडला. पट्टाभिषेक प्रक्रियेदरम्यान ममता कुलकर्णी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. “हा महादेव आणि महाकाली यांचा आदेश होता. माझ्या गुरूंनी मला हा दिलेला आदेश होता. त्यांनीच आजचा दिवस निवडला. यात मी काहीच केलं नाही”, अशी प्रतिक्रिया तिने यावेळी दिली.

‘करण अर्जुन’ आणि ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटांमधून ममता लोकप्रिय झाली. तिने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान अशा मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. मात्र 2000 च्या सुरुवातीला ती बॉलिवूडपासून दूर गेली परदेशात स्थायिक झाली. ममता तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत होती. तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केल्याचं म्हटलं जातं. परंतु, ममताने याचा कधी उल्लेख केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं गेलं. असं म्हणतात की ममता विकीसोबत 10 वर्षे दुबईत राहत होती. त्याचबरोबर असंही म्हटलं जात होतं की, तिने तिच्या पतीसह मिळून अनेक बेकायदेशीर कामंही केली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार