अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चक्कू हल्ला करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुंबईत घडला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून सैफवर हल्ला करणारा चोर फरार असून मुंबई पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या हल्ल्यासंदर्भात मुंबई पोलिसांबरोबरच सैफ अली खानच्या टीमनेही माहिती जारी केली आहे. या घटनेसंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात…
> रात्री एक ते दीडच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एक व्यक्ती सैफ अली खानच्या मुंबईमधील घरात शिरली. त्यानंतर घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरु केली. अंधाराचा फायदा घेत चोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
> घरातील कर्मचाऱ्यांची आरडाओरड ऐकून बाहेर नेमका काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी झोपेतून जागा झालेला सैफ अली खान बेडरुममधून बाहेर आला. सैफ जसा त्याच्या बेडरुममधून बाहेर आला तसा त्याच्या समोर हा चोर उभा असल्याचं दिसलं. एकीकडे चोर घरात शिरल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरु असतानाच सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी सैफला काही समजण्याच्या आधीच चोराने सैफ आपल्याला पकडेल या भीतने त्याच्याकडील चाकूने हल्ला केला.
> चोराने सैफवर सहा वार केले असून यापैकी दोन जखमा गंभीर स्वरुपाच्या आहेत. सैफच्या मानेवर, पाठीवर वार करण्यात आले आहेत. सैफच्या मणक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
> सैफ अली खानला त्याच्या घरातील कर्मचाऱ्यांनी रात्री साडेतीन वाजता रुग्णालायत दाखल केलं तेव्हा चोराने पाठीत खुपलेला चाकू तसाच होता. शस्त्रक्रीया करुन हा चाकू बाहेर काढण्यात आला असून सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
> सैफच्या मानेजवळ 10 सेंटीमीटर खोल जखम झाली आहे. काही वेळाने लिलावतीकडून अधिकृतपणे मेडिकल बुलेटीन जारी करण्यात येणार आहे.
> सैफची पत्नी अभिनेत्री करिना कपूर तसेच मुलं तैमुर, जेह हे तिघेही सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.
> लिलावती रुग्णालयातील डॉक्टर निरज उत्तमणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्र्यातील राहत्या घरी सैफ अली खानवर रात्री चाकूने हल्ला झाला.
> रात्री साडेतीन वाजता सैफ अली खानला जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती, डॉक्टर निरज उत्तमणी यांनी दिली. सैफवर एकूण सहा वार झाले आहेत.
> सैफवर सहा वेळा वार करण्यात आले असून त्यापैकी दोन जखमा खोलवर झालेल्या आहेत. यापैकी एक जखम त्याच्या मणक्याजवळ आहे. सध्या त्याच्यावर डॉक्टर नितीन डांगे, कॉस्मॅटिक सर्जन डॉक्टर लिना जैन, अॅनेथोलॉजिस्ट निशा गांधी उपचार करत आहेत.
> गुरुवारी मध्यरात्रीनंतर एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसून तिथं असणाऱ्या महिला मदतनीसांशी हुज्जत घालू लागली. ज्यावेळी या वादात अभिनेत्यानं उडी घेतली तेव्हा या अज्ञात माणसानं सैफवर चाकू हल्ला केला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
> दरम्यान, मुंबई पोलिसांची गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु झाला असून सैफच्या घरी काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.
> या हल्ल्यामध्ये सैफच्या घरी काम करणारी एक महिला कर्मचारीही जखमी झाली असून तिच्यावरही उपचार सुरु आहेत.