देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्याने पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरु केल्या आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला आहे.पण महापालिकेने दुसरीकडे लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरु केलेली नाही. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. याबाबतचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चीनमध्ये एचएमपीव्ही या साथरोगाचा उद्रेक झाला असून, अनेक राज्यांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे. या विषाणूची लागण बंगळूरमधील एका आठ महिन्यांच्या मुलीलाही झाल्याचे आढळून आले आहे. भारतात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून पुणे महापालिकेलाही खबरदारीसाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत.
पुण्यातील लोहगाव विमानतळावर देशभरातील विविध शहरातून विमाने येतात. रोज हजारो प्रवाशांची तेथे वर्दळ असते. बंगळूर येथूनही पुण्यामध्ये विमानांची ये जा आहे. कोरोनाची साथ पसरत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने विमानतळावर प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी सुरु केली होती. त्यासाठी डॉक्टर, नर्स यांचे पथक तैनात केले होते. संशयित वाटणाऱ्या प्रवाशाला थेट नायडू रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविले जात होते.त्यामुळे साथ रोगावर नियंत्रण आणता येत होते. कोरोनाचे नवे व्हेरिएंट आल्यानंतरही अशा प्रकारची तपासणी केली जात होती.
बेंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेला सतर्क राहण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. पण अजूनही महापालिकेने विमानतळावर प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरु केलेली नाही. त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे.
आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, ”लोहगाव विमानतळावर अद्याप प्रवाशांची तपासणी सुरु केलेली नाही. पुढच्या बैठकीत याबाबतचा निर्णय केला जाईल. या विषाणूंची चर्चा होत असली तरी त्यास घाबरू नये. पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा तयार आहे.
‘पीआर’प्रेमी क्रिकेटपट
महापालिकेने अजून कोणाचेही थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाहीत. हिवाळ्यामध्ये ताप, खोकला येण्यासह अतिअशक्तपणा येणे, उलट्या होणे, ताप वाढणे श्वसनास त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हावे.महापालिकेकडून अजून रुग्णांची माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले आहे. नायडू रुग्णालयात ५० खाटांचा विलगीकरण कक्ष तयार केला आहे.”
संसर्ग टाळण्यासाठी हे करा
खोकला किंवा शिंक येत असेल तोंड व नाक रुमाल, टिश्यू पेपरने झाका
साबण, पाणी किंवा सॅनिटाझर हात वारंवार धुवा
ताप, खोकला, शिंक येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा
भरपूर पाणी प्या, पौष्टिक पदार्थ खा
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी वायूविजन होईल याची दक्षता घ्या
संसर्ग टाळण्यासाठी हे करू नये
हस्तांदोलन करू नये
रुमाल, टिश्यू पेपरचा पुनर्वापर करू नये
आजारी लोकांच्या संपर्कात जाऊ नये
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका