नागपूरमध्ये भाजप महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर तब्बल तीन आठवड्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला. हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या या शपथविधी सोहळ्यात ३९ मंत्र्यांना शपथ देण्यात आलीय. यात ३३ कॅबिनेट मंत्री तर ६ राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.






नव्या सरकारमध्ये महायुतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय. तर काही जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आलंय. यात भाजपच्या दोन, शिवसेनेच्या ३ तर अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, रविंद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित यांना नव्या मंत्रिमंडळातून वगळलं आहे. यात रविंद्र चव्हाण यांना भाजपकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून आधीच्या सरकारमधील तिघांना डच्चू देण्यात आला. यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा समावेश आहे. यामुळे तिघेही नाराज असल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना शिवसेनेनं संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळलं आहे. छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. यामुळे भुजबळ समर्थक नाराज झाले आहेत. भुजबळ समर्थकांनी नाराजी व्यक्त करत सरकारला इशारासुद्धा दिला आहे. दिलीप वळसे पाटील हे लोकसभा निवडणुकीत सक्रीय नव्हते. त्यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारही केला नव्हता. यामुळे त्यांना कॅबिनेटमधून मंत्रिमंडळातून हटवण्यात आलं आहे.
छगन भुजबळ हे ओबीसी नेते असून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाला त्यांनी थेट विरोध केला होता. यामुळे राज्यात मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा वादही निर्माण झाला होता. मराठा समाजाची नाराजी ओढावली जाऊ नये यामुळे भुजबळांना डावललं असल्याची चर्चा आहे.











