मोठी बातमी! CM फडणवीसांच्या भेटीसाठी गौतम अदानी ‘सागर’वर; चर्चांना उधाण

0

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोघांमधील ही पहिली भेट ठरली असून. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी गौतम अदानी हे फडणवीसांची भेट घेण्यासाठी फडणवीसांचं निवासस्थान असलेल्या ‘सागर’ बंगल्यावर पोहचले होते. भेटीनंतर अदानी आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमानुसार पुढे जाण्यासाठी ‘सागर’ बंगल्यावरुन रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

हिवाळी अधिवेशनात गदारोळ

गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमधील कथित हितसंबंधांचा आरोप करत एकीकडे काँग्रेसने लोकसभेतील हिवाळी अधिवेशनात रान उठवलेलं असतानाच दुसरीकडे अदानींनी अशाप्रकारे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे. दोघांमध्ये या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र एकीकडे विरोधक सातत्याने अदानी आणि अंबानींच्या नावाने सरकारला लक्ष्य करत असतानाच दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट अदानी त्यांच्या सरकारी बंगल्यावर पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

धारावी प्रकल्प कनेक्शन

मुंबईमधील अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे अदानी समुहाच्या माध्यमातून पुर्णत्वास जातील अशी दाट शक्यता आहे. यापैकी प्रामुख्याने धारावी विकास प्रकल्प हा अदानींच्या माध्यमातून राबवला जाणार असून हा प्रकल्प शेकडो कोटींची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी राबवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी खास करुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वारंवार केले आहेत. धारावीमधील पुर्नर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील मूळ मुंबईकरांना बाहेर विस्थापित होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी प्रचारादरम्यान म्हटलं होतं. आपली सत्ता आल्यानंतर आधी धारावी प्रकल्प रद्द केला जाईल असंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळेच हा प्रकल्प आणि पर्यायाने अदानी विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी’

विधानसभा निवडणुकीच्या आधीच अजित पवारांनी अदानींबद्दल एक गौप्यस्फोटही केला होता. ‘द न्यूज मिनीट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये 2019 साली सकाळच्या शपथविधीनंतर स्थापन झालेल्या 80 तासांच्या सरकारबद्दल विचारलं असता अजित पवारांनी हे सरकार स्थापन करण्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये कोणकोण होतं याची यादीच सांगितलेली. यामध्ये अजित पवारांनी काका शरद पवार, अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: या बैठकीला होतो असं म्हटलं होतं. यावरुनही मोठा राजकीय वाद निर्माण झालेला. संजय राऊत यांनी या मुलाखतीवर भाष्य करताना, ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी आहेत,’ असं म्हटलं होतं.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन