अनेकदा विरोध करूनही नवनीत राणांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते बच्चू कडूंच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळेच ज्या ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवाराला विरोध करता येईल त्या त्या ठिकाणी तो करण्याची भूमिका बच्चू कडूंनी घेतल्याचं दिसतंय. बच्चू कडू आता अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.






अमरावती पाठोपाठ आता अकोल्यातही बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष वेगळ्या मूडमध्ये असल्याचं दिसतंय. बच्चू कडू हे अकोल्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठींबा देण्याची शक्यता आहे. रविवारी अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात प्रहार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावतीप्रमाणेच अकोल्यातही बच्चू कडू हे भाजपवर नाराज असल्याचं बोललं जातंय.
अकोल्याची राजकीय गणितं बदलणार
महाविकास आघाडीचे सरकार असताना बच्चू कडू अकोल्याचे पालकमंत्री होते. जिल्ह्यातील अकोट विधानसभेत प्रहारला 25 हजार तर मूर्तिजापूर विधानसभेत 10 हजार मतदान पडलं होतं. अकोला जिल्हा परिषदेत प्रहारचा एक जिल्हा परिषद सदस्य होता. तर अकोट पंचायत समितीतही एक सदस्य आहे. अमरावतीप्रमाणेच अकोल्यातही बच्चू कडूंना मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या विधानसभेवेळी प्रहारच्या उमेदवारांना मिळालेलं मतदान लक्षात घेतलं तर लोकसभेला बच्चू कडू हे भाजपच्या उमेदवाराचे राजकीय गणित बिघडवू शकतील अशी शक्यता आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा घ्यायचा निर्णय घेतला तर अकोल्यात राजकीय खळबळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बच्चू कडूंनी जर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर त्याचा परिणाम हा जिल्ह्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. अकोल्यात
अशी असेल अकोल्यातील लढत
अकोला लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील एक लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक. वंचित बहुजन आघाडीकडून स्वत: प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील आणि भाजपकडून महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे हे अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. वंचित आणि महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटल्यानंतर काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला आहे.











