“मी जे बोलतो ते करुन दाखवतो. सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या कर्तुत्ववान खासदाराला संसदेत पाठवा. त्यांच्या मागे मोदीजींची ताकद, माझी ताकद आणि ट्रीपल इंजिन असेल. अस पॉवरफुल शिलाजीत देऊ की बास विकासाचं काम एकदम जोरात होईल”,असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं. चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज (दि.4) राजुरा इथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्याचे आवाहन
राजुरा हा आदिवासीबहुल भाग असून तेलंगणा सीमेलगत आहे. या भागातील नागरिकांची यावेळी मोठी उपस्थिती होती. या सभेला संबोधित करताना गडकरी यांनी मुनगंटीवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वेगळ्या स्टाईलने भाषण केलं. त्यांच्या भाषणाने लोकांमध्ये हशा पिकला शिवाय टाळ्यांचा कडकडाट झाला.
चंद्रपूरमध्ये काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी
काँग्रेसने चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची केवळ एक जागा निवडून आली होती. बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते. ज्यांनी महाराष्ट्रात विजय मिळवला. दरम्यान, बाळू धानोरकर यांचे मे 2023 मध्ये निधन झाले. त्यानंतर काँग्रेस पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे.
नितीन गडकरी नागपूरमधून मैदानात
नितीन गडकरी त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाने नितीन गडकरींना नागपूरमधून उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस पक्षाने नितीन गडकरी यांच्याविरोधात विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र, नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांचा दारुण पराभव केला होता.