“आयुष्यात कधी घड्याळाला निवडून…”, पंकजा मुंडेंचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या “कमळ दिलं असतं तर…”

0

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या राज्यात प्रचाराच्या तोफा गाजताना दिसत आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडताना दिसत आहेत. त्यातच आता भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी एक मोठे विधान केले आहे. “घड्याळाला निवडून देण्याची वेळ कधी येईल असं मला वाटलं नव्हतं, ती आली. पण आता घड्याळ वेगळं झालं आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना तिकीट देण्यात आले आहे. सध्या धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे या मैदानात उतरल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केले होते. भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यामुळे यंदा परळी विधानसभेसाठी मुंडे भावंडांमधील संघर्ष टळला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
आता नुकतंच पंकजा मुंडे यांनी एक प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि घड्याळ चिन्हावर भाष्य केले. “माझ्या आयुष्यात मला कधी घड्याळाला मतदान मागायची वेळ येईल असे वाटले नव्हते. पण आता सर्व निवडणुकीत निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे जर त्यांनी सर्व ठिकाणी कमळ दिलं असतं तर निवडून आणलं असतं”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“आता घड्याळाला निवडून देण्याची वेळ कधी येईल असं मला वाटलं नव्हतं, पण ती आली. आता घड्याळ वेगळं झालं आहे. घड्याळाचं चित्र बदललंय. अजित पवार हे महायुतीत आलेत. त्यांनी मला पंकजा तुला लक्ष घालायचं, तुम्ही काम करा, ही जबाबदारी घ्या, असे सांगितले. मी ती जबाबदारी घेतलेली आहे”, असे पंकजा मुंडेंनी म्हटले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

४० वर्षात पहिल्यांदा कमळ गायब
दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सहभागी आहे. महायुतीमध्ये अनेक मतदारसंघांत विद्यमान आमदाराला पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघांतून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली. कारण गेल्यावेळी या मतदारसंघातून धनंजय मुंडे विजयी झाले होते. यंदा ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच या ठिकाणी कमळाचे चिन्ह असलेला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळत आहे. १९७८ ची निवडणूक वगळता त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत परळीतून कमळाच्या चिन्हावर भाजप उमेदवार लढला होता.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार