मी आणि उद्धव एकत्र येऊ नये, यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आतले आणि बाहेरचे अशा सगळ्यांचा समावेश आहे, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा काही ट्विस्ट येणार का, अशी शंका निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी दैनिक ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. यावेळी राज ठाकरे यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी उत्कंठा वाढवणारी अनेक वक्तव्यं केली.






मी माझ्याकडून अलर्ट असतो. अनेक गोष्टी माझ्या कानावर येत असतात. हा असे बोलला… तो तसे म्हणाला… अशा गोष्टी मला कळतात. पम असल्या गोष्टी मी ऐकत नाही. उद्धव ठाकरे आणि मी एकत्र यायला पाहिजे, असे वाटणे वेगळे आहे. असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. समोरुन त्यांच्याकडून काही लोक बोलत असतात, सांगत असतात. पण मी काय करणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
वर्षानुवर्षाचे वैर असणारे एकत्र येतात तर…. राज ठाकरेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणे हा माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की, यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे. तुम्ही जगभरात बघितले तर एकमेकांचे वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात. पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते, भाऊ जवळचा वाटत नाही. यावर मी काय बोलणार, अशी हतबलता राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
वर्सोव्यात हिंदुत्त्ववादी शिवसेनेचा उमेदवार हारुन खान आहेत. उर्दू भाषेतून त्यांची पत्रके निघत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जात नाही. उद्धव ठाकरे काँग्रेसचा मफलर गळ्यात घालून फिरतात. अशाप्रकारे उद्धव ठाकरे सगळाच व्यभिचार करणार असतील, त्यांच्याकडे बाकीच्या गोष्टींसाठी वेळ नाही. ही माझी खंत म्हणा किंवा अन्य काहीही म्हणा, पण हे वास्तव आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.











