खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याने थेट महायुतीत संभ्रम? कुलकर्णींच्या वक्तव्यावर मिटकरींचं तिखट उत्तर…”

0

अमोल मिटकरी स्टेजवर असतील तर मी स्टेजवर जाणार नाही असं मेधा कुलकर्णींनी सांगितलं. बारामतीतल्या प्रचारसभेबाबतचा हा मुद्दा मेधा कुलकर्णी यांनी सांगितला. यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. एका विशिष्ट समाजाची बाजू घेऊन जर मेधा कुलकर्णी बोलणार असतील तर लोक जी भीती व्यक्त करत आहेत की संविधान बदललं जाईल त्या चर्चांना हे वक्तव्य बळ देणारं आहे असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. आज सकाळपासूनच हा वाद रंगला आहे.

काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?

“अमोल मिटकरी हे बारामतीतल्या एका कार्यक्रमात स्टेजवर येणार होते. मी त्या स्टेजवर जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर अमोल मिटकरी त्या सभेला आलेच नाहीत. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची म्हणा, पण उगाच काही ऐकून घेणार नाही.” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीची ताकद आणखी वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरीचे पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर

शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही

“ब्राह्मण समाज अतिशय साधा आहे. मात्र विनाकारण कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही. पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्ट करणारे अमोल मिटकरी व्यासपीठावर येणार आहेत हे समजल्यावर मी ठाम भूमिका घेतली” असं त्यांनी स्पष्ट केलं. सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सत्कार मेधा कुलकर्णींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आणि अमोल मिटकरींबाबत काय भूमिका घेतली तेदेखील सांगितलं. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर अमोल मिटकरींनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहं भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात. ज्यावेळेस या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा कुणी व्यक्ती सदस्य होतो त्यावेळेस त्याला जी शपथ दिली असते ती महत्त्वाची असते. खासदारकीची शपथ दिल्यानंतर तो सदस्य कुठल्याही एका समाजाचा राहात नाही तो देशाचा होतो. जर शपथ घेतल्यानंतर आपण एका समाजापुरते आहोत असं कुणी वागत असेल तर भारतीय संविधानाच्या विचारधारेला ते छेद देण्यासारखं आहे. असाच प्रकार सांगलीत राज्यसभेच्या खासदारांकडून घडला.” असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

मेधा कुलकर्णींचं वक्तव्य संविधान बदलांच्या चर्चांना बळ देणारं

“बारामतीत युवक मेळावा होता, त्या युवक मेळाव्यात सूरज चव्हाणही उपस्थित होते. मी त्यांच्याबरोबरच गेलो होतो. त्यावेळी या सदस्या स्टेजवर बसल्या होत्या, मला आयोजकांकडून जेव्हा समजलं तेव्हा मी तिथून निघून गेलो मीच तिथे थांबलो नाही. अशा लोकांसह मलाच बसायचं नाही जे स्वतःला एका समाजाचे समजतात. जर जबाबदार नागरिक असाल तर तुम्ही कुणा एका समाजाचे असत नाहीत. मीच तिथून गेलो त्या बसून होत्या. इतक्या दिवसांपूर्वीचं वक्तव्य त्यांनी उकरुन काढलं आणि टाळ्या मिळवल्या. एका पदावर असताना एका समाजासाठी काम करत असतील तर हा भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्त्वाला छेद देण्याचा प्रकार आहे. जर असंच चालू राहिलं तर जनतेच्या मनात जी शंका राज्यघटनेबाबत येते आहे त्याला अधिकृत दुजोरा मिळेल. त्यामुळे त्यांनी केलेलं वक्तव्य साफ चुकीचं आणि खोटं आहे. समाजाची दिशाभूल करणारं आहे, स्टेजवर त्या आल्या नव्हत्या असं नाही त्या आहेत हे कळल्यावर मी गेलो नव्हतो हे निर्विवाद सत्य आहे.” असं अमोल मिटकरी म्हणाले. टीव्ही ९ मराठीला त्यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा