अजितदादांनी आबांचा किस्सा सांगितला, एकही जण भेटायला आला नाही…पद गेल्यावर कोण विचारत नाही!

0

पुणे : पद गेल्यावर कोण विचारत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत नेते आर आर पाटील यांचं उदाहरण दिलं. २६/११ नंतर राजीनामा देऊन आबा गावाला गेले, सहा महिन्यांनी भेटायला आले, तर म्हणाले, की एकही जण भेटायला आला नाही, असा किस्सा अजित पवार यांनी घोडेगाव येथील सभेत सांगितला. तर अमोल कोल्हेंना कसं निवडून आणलं इथपासून त्यांनी राजीनामा देण्याबाबत केलेला अट्टाहास, याचा लेखाजोखा अजित पवारांनी पुन्हा मांडला.

अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा प्रसंग एका चित्रपटात मांडला. त्या चित्रपटानंतर घडलेला प्रसंग अजित पवारांनी उपस्थितांसमोर मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ते अगदी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका, अरे काय केलं हे तुम्ही? समाज व्यसनाधीन होईल, अशा जाहिराती करून आपलं पोट भरू नये. पण ह्याचं काय चाललंय, अशा शब्दात अजितदादांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आढळरावांना लोकसभेला आणि दिलीप वळसे पाटलांना विधानसभेला असं मतदान तुम्ही आजवर करत आले ना? आता बाबांनो असं काही करू नका. आत्ताचे खासदार काहीही कागदपत्रे दाखवतात अन् म्हणतात मी अजित दादांकडे पाठपुरावा केला. गडी अलिकडच्या तारखा टाकतोय अन कागद नाचवतोय. धादांत खोटं बोलतो हा माणूस. मी प्रत्येकाची कामं नक्की करतो. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांना विचारा, ते विरोधात असतानाही मी कामं करायचो. कारण उद्या ते आपल्याकडे परतही येतील, शेवटी राजकारण आहे, अशी मिश्कील टिप्पणीही अजितदादांनी केली.

आता लक्षात ठेवा, हे भावनिक करतील, आता माझा पुतण्या बारामतीत रडला. आता काय रडून प्रश्न सुटणार आहेत का? तुमचे प्रश्न भावनिकतेने सुटणार नाहीत. मी महायुतीत गेलो, आता शरद पवार साहेबांसोबत मी बैठकीला गेलो. भाजप सोबत यांचं बोलणं सुरू होतो, त्यानुसार मी पुढं गेलो. नंतर ह्यांनी पलटी मारली, असा दावाही अजित पवारांनी केला. मी शब्दाचा पक्का आहे म्हणूनच 19 तारखेला पहाटेचा शपथविधी केला. माझ्याच चुलत्यांनी सांगितलं होतं म्हणून तर मी गेलो. नंतर माझाच चुलता बदलून पडला, अशी टीकाही त्यांनी केली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मी आई सोबत मतदानाला गेलो तरी हे राजकारण करतात, अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली. बारामतीत मी आई सोबत मतदानाला गेलो. आता मी ज्या आईच्या पोटी जन्माला आलो, तिला सोबत घेऊनच मतदानाला जाणार ना? बरं पहिल्यांदाच गेलो असं आहे का? प्रत्येक मतदानाला आई माझ्यासोबत मतदानाला येते. ह्यांच्या पोटात आत्ताच का दुखलं. म्हणाले दादा राजकारण करतायेत. आता यात कसलं राजकारण आलं. आईने मला सांगितलं, आपण दोघांनी सोबतच जायचं, म्हणून प्रत्येक वेळी प्रमाणे आम्ही मतदान केलं, असं अजित पवार म्हणाले.