महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे आहे. राष्ट्रवादीतील फूटीनंतर बारामतीत कुणाचा खासदार असणार, याची उत्सुकता असून, निकालाआधीच घटलेल्या मतदानाने दोन्ही उमेदवारांचं टेन्शन वाढवलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पूर्वीपासूनच ग्रामीण आणि शहरी अशी विभागणी झालेली असतानाच भाजपचे प्राबल्य असणारे आणि पारंपारिक संघर्ष अशीही विभागणी झाली होती. काल झालेल्या मतदानामध्ये बारामती विजय गुलाल कोणाचा याचे उत्तर मिळाले आहे.
बारामती विधानसभेत ही जागा जिंकणे अजित पवारांसाठी अपरिहार्य बनल्याचे चित्रं होतं तर दुसरीकडे शरद पवारांचे बारामतीतील वर्चस्व किती या मुद्द्यावरही प्रचार झाला आणि या निवडणुकीत बारामतीतील सुमारे ६४.५० टक्के लोकांनी कौल दिला. दिवसभर आमदार दत्ता भरणे यांच्या ‘व्हायरल क्लिप’मुळे इंदापूर विधानसभा दुपारच्या सत्रामध्ये मताची टक्केवारी वाढवून ६२.५० टक्के झाली तर डोंगरी मतदारसंघ असलेल्या भोर वेल्हा मुळशी 3 तालुक्यांमध्येही ५८.५२ टक्के झाले. सुरुवातीला पवार फॅमिलीशी केलेला विरोध आणि नंतर त्याच घड्याळाच तोरण बांधून दारोदारी फिरलेल्या शिवतारे यांच्या पुरंदर विधानसभेत मात्र लोकांना भूमिका पचनी पाडण्यात यश आले नाही की काय अशी शंका निर्माण झाली त्यामुळे त्याचा फटका मतदानावर बसून फक्त ४८ टक्के मतदान झाले.
भारतीय जनता पक्षाचे हक्काचे दोन विधानसभा मतदारसंघ दौंड अन् खडकवासला भागात मतांचा टक्का वाढल्याचे चित्रं दिसत असले तरी या भागातही पारंपरिक पवार विरुद्ध पवार हाच संघर्ष या दोन्हीही मतदार संघात प्रकर्षाने जाणवतो त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये खरंच भारतीय जनता पक्षाने खरी ताकद लावली होती की नाही ही शंका निर्माण झाली आहे. पुरंदर विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र लावलेली यंत्रणाही यावेळी चर्चेचा विषय बनली होती. दौंड विधानसभा भागातही मराठा आणि ओबीसी अशी विचारधारा घेऊन ओबीसी महासंघाच्या वतीने उभा करण्यात आलेला उमेदवार आणि प्रमुख लढती यामध्ये झालेले ५७.८० टक्के मतदान कोणाच्या पदरी किती पडेल हे चर्चेचा विषय झाला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक चर्चेचा आणि प्रमुख असलेला मतदारसंघ या मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी व्यक्तिगत घातलेले लक्ष लावलेली यंत्रणा आणि प्रचार यंत्रणा संपल्यानंतरही काम करणारे सुमारे 500 कर्मचारी यामुळे खडकवासला मतदार संघामध्ये काटे की टक्कर होणार अशी चर्चा निर्माण झाली होती परंतु या विधानसभा मतदारसंघांमध्ये ही पारंपरिक पवार विरुद्ध पवार हे चित्र प्रकर्षाने जाणवत असताना भाजपने फक्त सहभागाची भूमिका त्यामुळे खडकवासला विधानसभेत ५० टक्के मतदार कोणाच्या बाजूने झाले हे पाहावे लागणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाले आहे. घसरलेल्या टक्क्याने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची चिंता वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट… बारामतीत वर्चस्व कुणाचं?
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक गट बाहेर पडला. या गटाला मूळ राष्ट्रवादी म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे. दरम्यान, पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. ही जागा जिंकणे अजित पवारांसाठी अपरिहार्य बनल्याचे सध्या दिसत आहे. तर दुसरीकडे शरद पवारांचे बारामतीतील वर्चस्व किती हे ही या निवडणूक दिसून येणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले ते पहा
बारामती विधानसभा – ६४.५० टक्के
दौंड विधानसभा- ५७.८० टक्के
इंदापूर विधानसभा-६२.५० टक्के
भोर विधानसभा – ५८.५२ टक्के
खडकवासला विधानसभा- ५० टक्के
पुरंदर विधानसभा- ४८ टक्के
बारामती लोकसभा मतदारसंघात फक्तं ५.४७ टक्क्यांनी मतदान घट झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या खडकवासला आणि पुरंदर या दोन विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे. या मतदारसंघात भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे याच मतदारसंघात केवळ ४८ टक्के मतदान झाले आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार कोणत्या गटाकडे गेला, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात ६२.५० टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या मतदार संघातून कुणाच्या पारड्यात मते गेली हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.
संग्राम थोपटेंचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा
भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार आहेत. संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता. भोरमध्ये ५८.५२ टक्के मतदान झालेले आहे. भोरमध्ये थोपटे यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्याच्या अफवाही उडाल्या होत्या. या मतदारसंघातील मतदारांनी कुणाच्या पारड्यात मते टाकली हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
राहुल कूल यांच्या दौंड विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या पारड्यात किती मते पडणार? हाही कुतूहलाचा विषय आहे. त्याचबरोबर अजित पवारांशी वैर निर्माण झालेल्या आणि निवडणुकीच्या तोंडावर वाद मिटवून घेणाऱ्या विजय पुरंदरे यांचा प्रभाव असलेल्या पुरंदरमध्ये सुनेत्रा पवारांना किती मदत होते, हेही बघावं लागणार आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वतः अजित पवार आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेले आहे. त्यामुळे त्यामुळे बारामतीतील लोकांनी कुणाच्या पारड्यात मते टाकली, याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात असले, तरी घटलेल्या टक्क्याबद्दल सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. याचा फटका कुणाला बसणार? अशी चर्चा सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू आहे.