शिरुरमध्ये धरण आहे. पाणी आपल्या उशाशी आहे, मात्र काही जण पाणी पळवून नेत आहेत.जुन्नर आणि आंबेगावला जेवढी पाण्याची गरज आहे, तेवढच ठेवा. वर बोगदा काढा आणि ओव्हर फ्लोचे पाणी घेऊन जा. परंतु आता खालून बोगदा काढला तर उन्हाळ्यात आम्ही आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का? असे म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. शिरुरमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळरावांच्या प्रचारासाठी अजित पवारांची आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते मात्र भाषणं सुरुच राहिल्यानं अजित पवार संतापले. आढळरावांनी भाषणं करण्याची संधी न मिळालेल्यांची माफी मागितली आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना वाढवलं, नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला सोडून शरद पवार गेलेच ना? असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हणा साहेबांच्या विचारधारेला सोडून ते गेलेच ना? पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात स्वतः लिहिलं आहे. मी 35 वर्षे साथ दिली. पण आता मी 60 च्या वर गेलो, कधीपर्यंत थांबायचं मी आता.. मी अनेक वेळा साहेबांना सांगितले होते.
कोल्हेंच्या अभिनयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला
शिवरायांची भूमिका ते अगदी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका,समाज व्यसनाधीन होईल अशा जाहिराती करून आपलं पोट भरू नये, असे म्हणत अमोल कोल्हेंच्या अभिनयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला लगावला आहे.
मी आई सोबत मतदानाला गेलो तरी हे राजकारण करतात, अजित पवारांची खंत
बारामतीत मी आई सोबत मतदानाला गेलो. आता मी ज्या आईच्या पोटी जन्माला आलो, तिला सोबत घेऊनच मतदानाला जाणार ना? बरं पहिल्यांदाच गेलो असं आहे का? प्रत्येक मतदानाला माझी आई माझ्यासोबत मतदानाला येते. यांच्या पोटात आत्ताच का दुखलं? म्हणाले दादा राजकारण करत आहेत. आता यात कसलं राजकारण आलं. आईने मला सांगितलं, आपण दोघांनी सोबतच जायचं, म्हणून प्रत्येकवेळी प्रमाणे आम्ही मतदान केलं.
रडून प्रश्न सुटणार : अजित पवार
आढळरावांना लोकसभेला आणि दिलीप वळसे पाटलांना विधानसभेला असं मतदान तुम्ही आजवर करत आले ना? आता बाबांनो असं काही करू नका. आत्ताचे खासदार काहीही कागदपत्रे दाखवतात अन् म्हणतात मी अजित दादांकडे पाठपुरावा केला. गडी अलीकडच्या तारखा टाकतोय अन् कागद नाचवतोय. धादांत खोटं बोलतो हा माणूस. मी प्रत्येकाची कामं नक्की करतो. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांना विचारा, ते विरोधात असताना ही मी कामं करायचो. कारण उद्या ते आपल्याकडे परत ही येतील, शेवटी राजकारण आहे.आता लक्षात ठेवा हे भावनिक करतील, आता माझा पुतण्या बारामतीत लढला. आता काय रडून प्रश्न सुटणार आहेत का? तुमचे प्रश्न भावनिकतेने सुटणार नाही, असे देखील अजित पवार म्हणाले.
पदाशिवाय काही नाही : अजित पवार
पद गेल्यावर कोणी कोणाला विचारत नाही असं म्हणत अजित पवारांनी आर आर पाटलांचे उदाहरण दिलं. अजित पवार म्हणाले, 26/11 नंतर राजीनामा देऊन आबा गावाला गेले. सहा महिन्यांनी भेटायला आले तर म्हणाले एकही भेटायला आला नाही. पदाशिवाय काही नाही.