बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर प्रकृती अस्वस्थ त्यामुळे शरद पवार यांनी विश्रांती घेणे पसंत केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा ‘अॅक्टिव्ह’ मोडमध्ये येणार आहेत. महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी बुधवारी जाहीर सभा घेणार आहेत.






शिरूर मधील पाच कंदील चौकात बुधवारी दुपारी एक वाजता शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची ही तिसरी सभा आहे. तिसरा टप्प्याचे मतदान उरकल्यानंतर आता चौथ्या टप्प्यांमध्ये शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये महत्त्वाची लढत होणार आहे. या ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये प्रतिष्ठेची लढाई होत असून बारामती पाठोपाठ शिरूर मध्ये अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.
शिरूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती यामध्ये कोल्हेंवर जोरदार टीका या सभेतून करण्यात आली. कोल्हे यांना नाटकं जमतात तशी नाटक पाटील यांना आता येत नसल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. या टीकला उत्तर देताना कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे खरं आहे; मात्र त्यांना जनतेच्या मतांवर संसदेत जाऊन धंदा करता येतो, अशी अमोल कोल्हे यांनी टीका केली.
दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवित असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती मध्ये ठाण मांडून बसले होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्यांनी महायुतीच्या तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले होतं.
शिरूर चे विद्यमान खासदार डॉ. कोल्हे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करण्याचे आव्हान अजितदादांनी दिले आहे. बारामतीच्या प्रचारामुळे त्यांना शिरूरकडे पाहण्यास फारसा वेळ मिळाला नव्हता. मात्र आता बारामतीचे मतदान झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा शिरूर मतदारसंघात सक्रिय होत आहेत. डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांनाही थेट आव्हान दिले असल्याने आता शिरूरच्या सभेत कोल्हे अजित पवारांवर देखीलकाय बोलणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे.











