ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. खडसेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली होती. मात्र अजूनही त्यांचा भाजप प्रवेश रखडला आहे. एकनाथ खडसेंची भाजप घरवापसी नेमकी का रखडली? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. कोणत्याही अटीशर्ती शिवाय मी प्रवेश करणार आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.
खडसेंच्या प्रवेशावर राज्यातील ३ वरिष्ठ नेते उदासीन?
आता एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला याबाबत माहिती समोर आली आहे. राज्यातील प्रमुख तीन नेत्यांमुळे खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती मिळत आहे. केंद्राकडून एकनाथ खडसेंना राज्यात कार्यक्रम घेऊन सोबत घ्या, असे सांगण्यात आले. मात्र राज्यातील तीन वरिष्ठ नेते याबाबत उदासीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
खडसेंचा प्रवेश निवडणुकीनंतर?
निवडणूक काळात खडसेंना भाजपमध्ये घेतले तर स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण ढवळून निघेल. त्यामुळे निवडणुकीनंतर घेऊ, अशी काही नेत्यांची भूमिका असल्याचे समजते. जर परत केंद्राकडून विचारणा झाली तर खडसेंचा प्रवेश निवडणूकीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेशाला नक्की मुहूर्त कधी लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.