शिवसेना ठाकरे गटाने अखेर आज आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदार निवडणूक लढवणार असून नव्या चेहऱ्यांनादेखील संधी देण्यात आली आहे. ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे शिलेदार अमोल किर्तीकर यांनादेखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने किर्तीकर यांना समन्स बजावले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.






वायव्य मुंबईत किर्तीकर विरुद्ध किर्तीकर?
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते असलेले अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघातून त्यांचे वडील गजानन किर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत. गजानन किर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे या जागेसाठी भाजप आग्रही आहे. शिंदे गटही इतर उमेदवारासाठी चाचपणी करत असल्याची चर्चा आहे.
मविआ की महायुती? कोणाचे पारडं जड?
हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. मराठी मतदारांप्रमाणे उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्य समुदाय आहे. त्यामुळे भाषिक-धार्मिक कल लक्षात घेता हा मतदारसंघ संमिश्र आहे. मराठी मतांची तुलना करता अन्य भाषिक मतदारांची संख्या अधिक भरते. मराठी मते ही प्रामुख्याने शिवसेना, मनसेकडे वळत असल्याचे म्हटले जाते. महाविकास आघाडीमुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि डावे-समाजवादी मते एकत्र येतील. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या महायुतीमध्ये भाजपवर मोठी जबाबदारी असणार आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपकडे तीन आमदार आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे.
लोकसभा मतदारसंघातील विधानसभेतील आमदार कोणाचे?
जोगेश्वरी पूर्व – रविंद्र वायकर – शिवसेना शिंदे गट
> दिंडोशी – सुनील प्रभू – शिवसेना ठाकरे
> गोरेगाव – विद्या ठाकूर – भाजप
> वर्सोवा – भारती लव्हेकर – भाजप
> अंधेरी पश्चिम – अमित साटम – भाजप
> अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके – शिवसेना ठाकरे
अमोल किर्तीकर ईडी चौकशीच्या फेऱ्यात
कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांची चौकशी सुरू आहे. याआधी देखील किर्तीकर यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी समन्स धाडलं आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या किर्तीकरांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
अटकेची टांगती तलवार?
मुंबई महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे शिलेदार आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. आता याच प्रकरणात ईडी पुन्हा एकदा अमोल किर्तीकर यांची चौकशी करणार आहे. त्यामुळे आता अमोल किर्तीकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू आहे.










