अकोला : वंचित बहुजन आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? याची उत्सुकता संपुर्ण राज्याला लागली आहे. याचसंदर्भातील अंतिम निर्णय आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता अकोल्यात यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद पार पडेल. पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर आपल्या पक्षाची लोकसभा निवडणुकीतील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत राहणार? स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी स्थापन करणार? हे आजच्या पत्रकार परिषदेतून समोर येणार आहे.






मंगळवारी वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या कोअर टीमची बैठक पार पडली. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहणार? स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी स्थापन करणार? यावर आजच्या पत्रकार परिषदेत निर्णय होणार आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर आपली भूमिका पत्रकार परिषदेतून जाहीर करणार आहेत. पण त्यापूर्वी बुधवारी रात्री वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांची आंतरवाली सराटीत भेट घेतली. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, प्रकाश आंबेडकरांच्या मनात वेगळं काहीतरी चालल्याची शक्यता बळावली आहे. या दोघांच्या भेटीत अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.
वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या कोअर टीमच्या बैठकींचं सत्र
दरम्यान, काल (मंगळवारी) दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचं अकोल्यात बैठकांचं सत्र चाललं आहे. या बैठकीला प्रकाश आंबेडकरांसह प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर पक्षाच्या नेत्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, फारूख अहमद, मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, जेष्ठ नेते अशोक सोनोने यांची उपस्थिती होती.
रात्री उशिरापर्यंत पक्षाच्या भूमिकेवर नेत्यांमध्ये खल झाला आहे. या घडामोडीनंतर आज आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार? स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी स्थापन करणार? याचा निर्णय होणार आहे. दरम्यान, काल महाविकास आघाडीनं आंबेडकरांना दिलेल्या पाच जागांच्या नवा प्रस्तावानंतर प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीकडून वंचितला चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव
वंचित बहुजन आघाडी संदर्भात महाविकास आघाडीची वेट अँड वॉच भूमिका असल्याचं दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीला आता चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून आणखी एक जागा अधिकची देण्याचा आज प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाची यादी ही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर, म्हणजे बुधवारी जाहीर होणार आहे. भिवंडी, सांगली आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटला असल्याची माहिती आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार, जालन्याची जागा काँग्रेस तर सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे. तसेच, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटच लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.











