आत्ता ‘वंचित’ने निर्णय घ्यावा; पुण्यासाठी इच्छुक असलेल्या वसंत मोरेंनी पवारांनंतर घेतली संजय राऊतांची भेट; पण…

0

लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी दुपारी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षात सध्या धावपळ सुरू आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे नेते मंडळींकडून गाठीभेटी घेतल्या जात असल्याने रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यातच पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर वसंत मोरे यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशा चर्चेला उधाण आले आहे.

वसंत मोरे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, वसंत मोरे मला भेटायला आले होते. तासभर त्यांच्या सोबत चर्चा झाली. मी त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली. मात्र, त्यांना पुण्याची लोकसभेची जागा लढवायची आहे. मात्र, ती जागा शिवसेनेकडे नसून काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या जागेबाबत काँग्रेस निर्णय घेणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची त्यांना भेट घेण्यास सांगितले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांची निवड होते. भाजपने निवडणूक आयुक्तालय ताब्यात घेतले आहे. १०० वर्षे लोकशाही वाचवण्यासाठी अनेकांनी लढा दिलेला आहे. आमच्यासारखेही लढा देत राहतील. महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून कुठलेही मतभेद नाहीत. आजच्या बैठकीत एक-दोन जागा आहेत, त्यावर किरकोळ चर्चा होईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

वंचितला चार जागांची ऑफर दिली

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून नेत्यांमध्ये काहीही मतभेद नाहीत. जागेसाठी कार्यकर्ते आग्रही असतात. वंचित आघाडीला आम्ही लोकसभेच्या चार जागांची ऑफर दिलेली आहे. त्यात अकोल्याच्या जागेचा सहभाग आहे. त्यामुळे आता याबाबत प्रकाश आंबेडकर यांना निर्णय घ्यायचा आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

राज्यातील मुस्लिम आणि दलित वर्ग हा या वेळी भाजपला मतदान करणार नाही. एमआयएम (MIM) आणि वंचितची युती होणार नाही. आम्ही तीन प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्षसोबत आहोत. मी कधीही खोटं बोलत नाही मी सर्व बैठकांना उपस्थित होतो, असेही या वेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केले.