पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वीच मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी गुरुवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. ते शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचल्याने सुरुवातीला वसंत मोरे पक्षप्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे पक्षप्रवेश न करताच माघारी परतले. त्यांच्या या कृतीने अनेकजण बुचकाळ्यात पडले. त्यामुळे वसंत मोरे यांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन घोळत आहेत का, अशी चर्चा आता रंगली आहे.
वसंत मोरे आणि शरद पवार यांची निसर्ग मंगल कार्यालयामध्ये भेट झाल्यानंतरच पुणे शहरांमध्ये वसंत मोरे हे पुणे लोकसभा मनसे व्यतिरिक्त अन्य पक्षातून लढतील अशी अटकळ बांधली जात होती अन् झाले ही तसेच! नुकताच वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपण पुणे लोकसभेचे दावेदार आहोत अशी भीमगर्जना केली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांच्यासाठी पुणे शहरांमध्ये एक वेगळे वातावरण पाहण्यास मिळत आहे परंतु भारतीय जनता पक्षाने एक वेगळी खेळी खेळत सर्वपरिचित आणि जातीय समीकरणे जुळवत मराठा समाजाला संधी देत महाविकास आघाडीच्या ‘M कार्ड’ या खेळीवरती मात करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सध्याचे पुणे शहराचे वातावरण आणि भाजपविरोधी जनमत करण्याची आग्रही काँग्रेसची भूमिका लक्षात घेता या लोकसभा मतदारसंघांमध्ये काहीतरी घडू शकतो ही जाणीव शरद पवार यांना झाल्यामुळेच त्यांनी आपली सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती शरद पवारगट यांचे संघटन आणि काँग्रेसची रणनीती या जोरावर उमेदवार दिला तर एक नवा प्रयोग होण्याची चाहूल शरद पवार यांना लागल्यामुळेच त्यांनी वसंत मोरे यांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश न करता पुणे लोकसभेमध्ये संभ्रम कायम ठेवला आहे.
वसंत मोरे यांनी आपल्याला सर्वपक्षाच्या नेत्यांकडून फोन आल्याचे सांगितले. यामध्ये संजय राऊत, मुरलीधर मोहोळ, मोहन जोशी यांचा समावेश होता. परंतु, आज वसंत मोरे हे शरद पवारांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचल्याने ते पक्षप्रवेश करणारच, अशी खात्री अनेकांना पटली. परंतु, काही वेळातच वसंत मोरे कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मी याठिकाणी पक्ष प्रवेशासाठी आलेलो नाही. मला सुप्रियाताईंना आज भेटीसाठी वेळ दिली होती, त्यामुळे मी आज याठिकाणी आलो होतो. असे सांगतानाच मी काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली आहे. अन् शिवसेना नेत्यांशीही माझे बोलणे झाले असे म्हटल्यामुळे पुण्यात एक वेगळा प्रयोग करु शकतो.
कसब्याची पुनरावृत्ती करायची असेल तर त्यासाठी पुणे लोकसभेचा उमेदवार वसंत मोरे कशाप्रकारे योग्य असू शकतो, हे पवार साहेबांना सांगायला आलो होतो. मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे, हे मी शरद पवारांना सांगितले आहे. पवार साहेब महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत ते सर्व गोष्ट समजू शकतात. मविआतील इतर नेत्यांनाही ते ही गोष्ट समजवू सांगू शकतात. त्यामुळे मला माझी भूमिका स्पष्ट करण्यास दोन दिवस लागतील, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
पुण्यातून कोणाला लोकसभेची उमेदवारी?
भाजपने नुकतीच महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये भाजपने पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणाला रिंगणात उतरवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मविआच्या जागावाटपात पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल. त्यामुळे काँग्रेस वसंत मोरे यांच्यासाठी पुणे लोकसभेवरील दावा सोडणार का? महाविकास आघाडी मोरेंच्या पाठिशी एकत्रपणे ताकद उभी करणार का, हे आता पाहावे लागेल.