लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग

0

लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला आता वेग आला आहे. ‘महाविजय 2024’ समितीच्या सदस्यांची आज मुंबईत होणार महत्वाची बैठक होणार आहे. भाजप प्रदेश मुख्यालयात आज सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत या बैठकीत मंथन होणार आहे. या बैठकीत लोकसभा , विधानसभा निवडणूकीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर हे नेते या बैठकीस उपस्थित असतील.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा आत कोणत्याही क्षणी जाहीर होतील. त्याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. भाजपही निवडणुकीसाठी सज्ज असून भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. या दोन याद्यांमध्ये राज्यातील अनेक महत्वाच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

याच पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसून तयारी सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून आजची ही बैठक घेण्यात येत आहे. ‘महाविजय 2024’ ही भाजपची एक समिती असून वारंवार अशा बैठका घेत असते. आगामी काळात काय करणं गरजेचं आहे , निवडणूक जिंकून कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने संदेश दिला पाहिजे, या सगळ्याचा लेखाजोगा ही समिती घेत असते. आज सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होणार असून दुपारपर्यंत ती चालेल. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राज्यातील सगळ्या लोकसभा उमेदवारांची तयारी कशी सुरू आहे, याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा