पुणे- महाराष्ट्रातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील महिलांसाठी ‘सशुल्क मासिक पाळी रजा’ धोरण लागू करण्याची मागणी भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केली आहे. कर्नाटक सरकारने अलीकडेच असे धोरण लागू केले असून, महाराष्ट्रानेदेखील महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाकडे लक्ष देणारे हे धोरण स्वीकारावे, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे कामगार मंत्री यांना लिहिलेल्या पत्रात, डॉ. कुचिक यांनी मासिक पाळी हा महिलांचा नैसर्गिक जैविक प्रक्रियेचा भाग असून, त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे ‘सशुल्क मासिक पाळी रजा’ देणे, हे केवळ नैसर्गिक प्रक्रियेची दखल घेणेच नाही, तर महिला सक्षमीकरण आणि कार्यक्षमता वाढवणारे असेल, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटक हे असे धोरण लागू करणारे पहिले राज्य असून, या धोरणाने महिलांच्या कामकाजाशी संबंधित आव्हानांची दखल घेतली आहे. याशिवाय, केरळ आणि बिहार या राज्यांनीही महिलांसाठी अशा प्रकारच्या सवलती लागू केल्या आहेत. विशेषतः बिहारने १९९२ पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांची मासिक पाळी रजा उपलब्ध करून दिली आहे.
डॉ. कुचिक यांनी यांनी पत्रात या धोरणाविषयी असे नमूद केले आहे की यामुळे आरोग्य आणि कल्याण सुधारणा होण्यास मदत होईल. तसेच महिलांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. स्वस्थ आणि आरामदायक कर्मचारी नैसर्गिकरित्या अधिक कार्यक्षम असतात, त्यामुळे ‘सशुल्क मासिक पाळी रजा’ कामाच्या कार्यक्षमतेत वाढ करू शकते.
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच महिलांच्या कल्याणासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे, ज्याने राज्यात महिलांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘सशुल्क मासिक पाळी रजा’ धोरण हा महिलांना अधिक आधार देण्याचा एक नैसर्गिक पुढचा टप्पा ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
जर हे धोरण महाराष्ट्रात लागू झाले, तर राज्यातील महिलांच्या कार्यक्षमता आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल, विशेषतः त्या क्षेत्रांमध्ये जिथे मानसिक किंवा शारीरिक ताण जास्त असतो. या प्रस्तावाबाबत महाराष्ट्र सरकार कोणती पाऊले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या देशातील अनेक राज्ये महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या जागतिक ट्रेंडकडे पाहत आहेत. या दिशेने महाराष्ट्राने देखील पाऊले उचलल्यास महिलांच्या कामकाजाच्या वातावरणात महत्त्वपूर्ण बदल घडून येऊ शकतो.