अत्यंत प्रतिष्ठेची असलेल्या पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपाने आपल्या दुसऱ्या यादीत पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. गेले 2 टर्म पुणे मध्ये भाजपचा उमेदवार विजयी होत असून मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांमध्ये कायम गुंतलेला आणि प्रसंगी डॅशिंग भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाला संधी देऊन विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. मनसेतील नाराजी नाट्य आणि शरद पवारांची भेट यामुळे महाविकास आघाडी ही मराठा आरक्षणाची दखल घेऊन नवखा उमेदवार देण्याची चर्चा सुरू होती परंतु भाजपने मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता त्यांच्या विरोधात काँग्रेस कोणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.






एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख पुणे लोकसभा मतदार संघाची होती. एक ते दोन अपवाद वगळता काँग्रेसच्याच उमेदवाराने या मतदारसंघातून लोकसभेसाठी प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा 28 वर्षानंतर ज्या उमेदवाराच्या जोरावरती काँग्रेसने सर केला. त्या उमेदवाराला संधी देण्याची सध्या चर्चा सुरू आहे; परंतु काँग्रेसची पारंपारिक ताकत असलेला हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी आणि सलग दोन पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेसनेही सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.भारतीय जनता पक्षाचे वतीने मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने प्रादेशिक आणि जातीय समीकरणे जुळवत विजय मिळवण्याची समीकरणे आखली असली तरी काँग्रेसच्या गोटातून पुन्हा ‘सोशल इंजिनिअरिंग’चा फॉर्मुला वापरत मनसेतून नाराज असलेल्या चेहऱ्याला योग्य आश्वासन देऊन एक नवा प्रयोग करण्याचे सूतोवाच मिळतं आहेत. काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पुणे लोकसभेसाठी अनेक वर्षे पुण्यातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. परंतु उमेदवारी देताना कायमच वेगळे विचार करण्यात आल्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात पराभव सहन करावा लागला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अनिल शिरोळे हे पुणे लोकसभेतून निवडून आले. त्यानंतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गिरीश बापट यांना भाजपने उमेदवारी दिली. बापट यांनी मोठ्या मताधिक्याने मोहन जोशी यांचा पराभव केल्यामुळे काँग्रेसला हे पक्क लक्षात आलं आहे की आपला पारंपारिक मतदार सोडून फक्त जाती राजकारण हा आपल्या विजयास उपयोगी नसलेला फॉर्मुला आहे; मुळात मराठा आरक्षणाची दखल घेत भारतीय जनता पक्षाने मराठा बहुल उमेदवारांना संधी दिली त्यामुळेच ओबीसी समुदायाला नेतृत्व करण्याची संधी दिल्यास सर्व समावेशक मतदार आकर्षित करण्याचा कल वाढत आहे. ‘हक्काचा माणूस ‘ अशी ओळख आमदार रवींद्र धंगेकर यांची असून त्यांनी गेल्या काही महिन्यातच लोकांमध्ये जाऊन आपली वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. महागाई, शहरात वाढलेली वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज अशा विविध प्रश्नांवर धंगेकर यांनी आवाज उठविला आहे. तसेच कसबा भागातील विविध विकास कामे यानिमित्ताने ते नागरिकांशी जोडलेले असतात. त्यामुळे काँग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.
‘अबकी बार 400 पार’ हा नारा देत भाजपने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्धार केला आहे. भाजपाला पराभूत करायचे झाल्यास त्याच ताकदीचा आणि जनसामान्यात मिसळणारा उठबस असणारा उमेदवार महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे. त्यामुळेच कायम जन माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असणारे नेतृत्व आणि शहरातील विविध प्रश्नांवरती ठोक भूमिका घेण्याची धमक दाखवत पडेल ती परिस्थिती हाताळणे ही भूमिका घेत असलेल्या कसबा आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली जाऊ शकते. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे आता लक्ष लागले आहे. आमदार धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या दृष्टीने आपला प्रचार सुरू केला आहे. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसब्यात धंगेकर यांचा विजय काँग्रेसला प्रोत्साहन देणारा ठरला आहे. आजही सकाळी महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून त्यांनी थेट आव्हान निर्माण केले आहे.
भाजप प्रचाराची बलस्थाने
– उमेदवाराचा सर्वपरिचित चेहरा
– भारतीय जनता पक्षाचे उत्तम संघटन
– मित्रपक्षांची तुल्यबळ साथ
– राज्यसभेमुळे जातीय समीकरणाची जुळवाजुळव
– निवडणूक यंत्रणा स्वतंत्र हाताळण्यास सक्षम मनुष्यबळ
– मतदारांचा केंद्रीय स्तरावरती वेगळा विचार करण्याची भूमिका
या आहेत जमेच्या बाजू
– एक हाती सत्ता मिळाल्यामुळे शहरात वाढलेल्या समस्या
– पारंपरिक कसबा विजयामुळे उर्जित अवस्था
– शिवसेना व शरद पवार यांच्या मतांचाही भरघोस पाठिंबा
– वर्षभर नागरी समस्या आणि शहराचे भविष्यावरती कायम आंदोलने निवेदने आणि भक्कम भूमिका
– ललित पाटील आंदोलन आणि पुण्यातील एमडीएफ ड्रग्स बाबत भरीव पाठपुरावा











