महायुती जागावाटपात अजितदादांची सरशी, शिंदेंवर कुरघोडी; महायुती नवा फॉर्म्युला तयार? लवकरच घोषणा

0

मुंबई: सत्ताधारी भाजपनं महाराष्ट्रातील २० मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मागील निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवल्या होत्या. यातील २० जागांसाठी भाजपनं उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. भाजपचं मित्रपक्षांसोबत अद्याप जागावाटप झालेलं नाही. मागील आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याला आठवडा उलटला तरीही महायुतीला जागावाटप मार्गी लावता आलेलं नाही.

महायुतीत जागावाटपाचा नवा फॉर्म्युला आला आहे. त्यानुसार भाजप ३०, शिंदेंची शिवसेना ११ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ७ जागांवर लढेल, अशी माहिती न्यू इंडियन एक्स्प्रेसनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. महायुतीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपनं आधी ३२ जागांचा आग्रह धरला होता. पण मित्रपक्षांनी याबद्दल नाराजी दर्शवली. त्यामुळे जागावाटपासाठी नवं सूत्र तयार करण्यात आल्याची माहिती एनडीएतील सुत्रांनी दिली.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

राष्ट्रवादीला सात जागा सोडण्यात येतील. मागील निवडणुकीत पक्षानं जिंकलेल्या ४ जागांसह गडचिरोली, उस्मानाबाद आणि परभणी मतदारसंघ राष्ट्रवादीला दिले जातील. शिंदेंसोबत १३ खासदार आहेत. पण भाजपनं त्यांना ११ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या निवडणुकीत सेनेनं लढवलेल्या दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण जागेसाठी भाजप आग्रही आहे. यापैकी ठाणे, दक्षिण मुंबईचे खासदार ठाकरेंसोबत आहेत. तर कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आहेत.

सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंसोबत १३ खासदार आहेत. तरीही भाजपनं त्यांना ११ जागा देऊ केल्या आहेत. तर लोकसभेचा केवळ एक खासदार सोबत असतानाही अजित पवारांना वाटाघाटीत ७ जागा पदरात पाडून घेण्यात यश आलं आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांनी कुरघोडी केल्याचं दिसत आहे. तर शिंदेंना सध्या सोबत असलेल्या खासदारांच्या संख्येइतक्या जागा मिळवण्यातही अपयश आल्याचं चित्र आहे.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

कल्याण मतदारसंघ आपल्याला मिळेल असा विश्वास भाजपला आहे. या मतदारसंघात भाजपला विजयाची खात्री वाटते. पण एकनाथ शिंदे लेकाचा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत. कल्याण न मिळाल्यास भाजप ठाण्यासाठी आग्रही असेल. ठाणे लोकसभा मिळाल्यास इथून भाजपकडून गणेश नाईक यांना उमेदवारी मिळू शकते. याबद्दल चर्चा सुरू असून लवकरच घोषणा अपेक्षित आहे.