पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दोनदा बिबट्या दिसल्याने प्रवाशांमध्ये आणि विमानतळाशेजारी राहणाऱ्या स्थानिकांमध्ये घबराट पसरली. सोमवारी सकाळी आणि रात्री बिबट्या दिसल्याने प्रशासन आणि वन विभाग सतर्क झाला असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. हा बिबट्या नवीन टर्मिनल पासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर आल्याने प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. स्थानिक नागरिकांच्या ग्रुपवर बिबट्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला.






पुणे विमानतळावर सोमवारी सकाळी ७ वाजता आणि नंतर रात्री ८ वाजता दोनदा बिबट्या दिसला. स्थानिक नागरिकांच्या ग्रुपमध्ये पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, विमानतळाच्या एअरसाईडवर, प्रतिबंधित क्षेत्रात जिथे लँडिंग, टेक-ऑफ आणि जमिनीवरील हालचाली यासारख्या महत्त्वाचे विमान ऑपरेशन्स होतात, तिथे बिबट्या आढळून आला. पण सोमवारी विमानांच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही, असे विमानतळावरील सूत्रांनी सांगितले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की ते विमानतळ परिसरात बिबट्याचा माग काढत आहेत. “सोमवारी सकाळी ७ वाजता आणि नंतर दिवसा रात्री ८ वाजताच्या सुमारास तो दिसला. रात्री तो धावपट्टीपासून सुमारे ५०० मीटर आणि नवीन टर्मिनल इमारतीपासून ७००-८०० मीटर अंतरावर दिसला. आम्ही आता विमानतळाच्या एअरसाईडवर त्याचा शोध घेत आहोत. आम्ही कॅमेरा ट्रॅप बसवले आहेत. आम्हाला आशा आहे की आम्ही मंगळवारी तो पकडू,” असे पुणे वन विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुरेश वरक यांनी सांगितले.
पुणे विमानतळ सल्लागार समितीने विमानतळ परिसरात वन्य प्राण्यांच्या वावराबाबत चर्चा करण्यासाठी ज्या दिवशी बैठक घेतली त्याच दिवशी बिबट्या दिसला. बैठकीदरम्यान, पुणे विमानतळाचे संयुक्तपणे संचालन करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आवाहन केल्याचे समजते. सल्लागार समितीची बैठक नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यात आयएएफ, सीआयएसएफ आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.मोहोळ यांनी सांगितले की, “बैठकीदरम्यान, बिबट्या दिसण्याबद्दल चर्चा झाली. मी अधिक जाणून घेण्यासाठी पुणे विमानतळ संचालक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले की त्यांनी आता त्यांच्या सर्व शेजाऱ्यांना दरवाजे बंद करून सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. विमाननगरमधील एका गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशाने सांगितले की काही दिवसांपूर्वी एअर फोर्स स्टेशन कॅम्पसमध्ये बिबट्या दिसला होता. आता पुन्हा सोमवारी दोनदा बिबट्या दिसल्याने रहिवाशांमध्ये घबराट आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलला बिबट्याचा व्हिडिओ एअर फोर्स स्टेशन कॅम्पसच्या आतून घेण्यात आला होता. त्यात स्पॉटलाइट्समध्ये बिबट्या सीमा भिंतीच्या काटेरी तारांवर उडी मारताना दिसत आहे. विमानतळाजवळील एका गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या एका निवृत्त आयएएफ अधिकाऱ्याने सांगितले की, कॅम्पसमधील एअर फोर्स स्कूलला मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की सुट्टीच्या सूचनेत या घोषणेचे नेमके कारण नमूद केलेले नाही.











