आयपीएल 2025 च्या हंगामात काल (13 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने रोमांचक विजय मिळवताना दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. या शानदार कामगिरीसह मुंबईने आपला दुसरा विजय नोंदवला. तसेच, दिल्लीचा हा यंदाच्या सत्रातील पहिला पराभवही ठरला. विशेष म्हणजे, पहिल्या डावात 200 हून अधिक धावा काढल्यानंतर अपराजित राहण्याची कामगिरी मुंबईने कायम राखली. मुंबईने 20 षटकांत 5 बाद 205 धावा उभारल्यानंतर दिल्लीला 19 षटकांत 193 धावांत गुंडाळले. तीन फलंदाजांना बाद करणारा कर्ण शर्मा सामनावीर ठरला. मुंबई आणि दिल्लीच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि करुण नायर यांच्यात वाद पाहायला मिळाला. यादरम्यानचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.







करुण नायरने 40 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी केली. जसप्रीत बुमराहच्या षटाकात करुण नायरने 18 धावाही केल्या. तसेच बुमराहच्या षटकात करुण नायरने अर्धशतक पूर्ण केले. याचदरम्यान षटक संपल्यानंतर करुण नायर आणि बुमराहमध्ये वाद झाला. दुसरी धाव घेण्यासाठी धावत असताना करुण नायर गोलंदाजी करत असलेल्या जसप्रीत बुमराहला आदळला. यानंतर ड्रिंक्स ब्रेकदरम्यान तु ज्या ठिकाणाहून धावतोय, ती माझी जागा आहे (तो स्पेस गोलंदाचा आहे) असं जसप्रीत बुमराह करुण नायरला म्हणाला. यानंतर करुण नायरही बुमराहला काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर करुण नायर हार्दिक पांड्याकडे गेला आणि त्याला काहीतरी समजावू लागला. यानंतर हार्दिकने करुण नायरचं ऐकून घेतल्याचं पाहायला मिळालं.
सामना संपताच करुण नायर म्हणाला…
सामना संपल्यानंतर करुण नायर म्हणाला की, माझ्या खेळीबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, कारण मी चांगला खेळलो, पण संघासाठी शेवटपर्यंत फलंदाजी करु शकलो नाही, त्यामुळे मी खूप निराश आहे. आम्ही सामना जिंकण्यासाठी खेळतो. त्यामुळे पराभवानंतर निराश व्हायला होतं आणि आपण कितीही धावा केल्या तरी, जर संघ जिंकला नाही तर त्याला काही अर्थ नाही. माझ्यासाठी संघाचा विजय खूप महत्त्वाचा होता आणि तो होऊ शकला नाही. पण हा एक धडा आहे आणि आपण पुढे जाऊ आणि मला आशा आहे की मी अशीच कामगिरी करत राहीन आणि आम्ही जिंकू, असं करुण नायर म्हणाला. करुण नायरला जसप्रीत बुमराहबद्दल विचारताच जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असं म्हणत करुण नायरने कौतुक केलं.











