पाषाण मध्ये सध्या वेगळीच लगबग सुरू आहे.मनभेद मतभेद बाजूला सारून संपूर्ण गाव झटतयं….. पक्ष परिवार अन् अन्य पदाच्या झालरी गळून सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन एक सोहळा आयोजित करत आहेत.ते म्हणजे….. समाजभूषण ह.भ.प. शांताराम सयाजीबुवा निम्हण (अण्णा) यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा! बस शांताराम अण्णा या एकाचं नावावर सगळं दंभ गळाले अन् सगळे ग्रामस्थ एका चादरीवर बसले.
पाषाण म्हटलं की घराणेशाही अन् अंतर्गत वाद हे पुणे शहरभर ज्ञात पण आकाशाला गवसणी घालुनही पाय जमिनीवर आणि निष्ठा व परंपरेचा वारकरी अजूनही जिवंत ठेवत आपल्या अविट आवाजाने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरेल सर्वांचे लाडके व आदरणीय… समाजभूषण ह.भ.प. शांताराम सयाजीबुवा निम्हण (अण्णा) यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा (७५वा वाढदिवस) च्या निमित्ताने गाव एकत्र होतेय ही खरंच एक नव आरंभच म्हणावा लागेल.
ज्ञानदीप मंगल कार्यालय, सूसरोड, पाषाण, रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ५.३० वा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समारंभाचे अध्यक्ष म्हणुन माजी खा. विदुराजी उर्फ नानासाहेब नवले उपस्थित राहणार आहेत तर ह.भ.प. केशव महाराज नामदास (नामदेव महाराजांचे वंशज), ह.भ.प. गोपाळ महाराज गोविंद गोसावी (विश्वस्त सोपानदेव समाधी संस्था सासवड), ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहुकर (जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज), संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, मा. उल्हासदादा पवार व ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप (अण्णा) यांच्या उपस्थितीमध्ये अमृतमहोत्सव सोहळा तसेच आण्णांच्या कारकिर्दितील सामाजिक व वारकरी सांप्रदायिक कार्याचा आढावा घेणान्या “सभाव भजन” गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
समाजभूषण ह.भ.प. शांताराम सयाजीबुवा निम्हण (अण्णा) यांनी “लौकिकापूर्ती नोहे माझी सेवा” या संतवचनाप्रमाणे अण्णांनी माझा सत्कार हा समाजउपयोगी असावा असे मनोगत व्यक्त केले. त्यानुसार प्रतिसाद देऊन “समाजभूषण ह.भ.प. शांताराम सावजीबुवा निम्हण ट्रस्ट” तयार करुन सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. या अंतर्गतच रविवार कि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन व मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. वारकरी व सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच अण्णांप्रती स्नेह व श्रद्धा असणारे सर्वजणांनी ज्ञानदीप मंगल कार्यालय, सरोड, पाषाण, पुणे 21 येथे उपस्थित राहण्याची आवाहन समस्थ ग्रामस्थ व भजनी मंडळ पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी यांनी केले आहे.