प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेची पोलिसांनी तातडीनं दखल घेऊन त्याचा तपास सुरु केला होता. आता त्यामध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये काल आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलीवूडविश्वात मोठी खळबळ उडाली होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कलाकृतींनीं त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यात त्यांचे जाणे हे अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे होते. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देसाई यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याविषयी वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ECL finanace कंपनीच्या एडेलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी सातत्यानं तगादा लावत मानसिक त्रास दिला. असे त्या तक्रारीत म्हटले गेले आहे. त्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
देसाई यांच्या या प्रकरणाची खालापूर पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून त्यात एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.