पुण्यात राहत्या घरात दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; शेवटचा कॉल मुलीला, नेमकं काय घडलं?; शवविच्छेदनाची प्रतीक्षा

0
24

घरातील बेडरूममध्ये पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील आणि त्यांच्याजवळच भिंतीला टेकून बसलेल्या संशयास्पद अवस्थेत पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. राहत्या घराच्या बेडरूममध्ये पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने नवी सांगवीत खळबळ उडाली आहे. पती-पत्नीत सतत वाद होत असल्याने या प्रकरणात अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. श्याम जग्गू वाघेला (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. त्यांची पत्नी राजश्री वाघेला (वय ४५, रा. शिवनेरी कॉलनी, नवी सांगवी) यांचा मृतदेह घरात भिंतीला टेकून बसलेल्या अवस्थेत आढळून आला. राजश्री यांच्या तोंडातून रक्त येत होते.

दरम्यान, दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल. नवी सांगवी येथील शिवनेरी कॉलनीत गुरुवारी (२४ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक  यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघेला कुटुंब मूळचे गुजरात येथील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते नवी सांगवी येथे राहतात. सध्या ते दोघेच घरी होते. त्यांना श्वेता आणि स्नेहल या दोन विवाहित मुली आहेत. श्वेता या नवी सांगवी येथे आणि स्नेहल पिंपळे-सौदागर येथे वास्तव्यास आहेत. राजश्री वाघेला या पिंपरीतील शाळेत शिक्षिका होत्या. श्याम वाघेला हे एका रिअल इस्टेटच्या कार्यालयात नोकरी करीत होते. पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून दोघा पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. याच कारणावरून बुधवारी (२३ जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

राजश्री वाघेला यांनी या वादानंतर आपल्या दोन्ही मुलींना फोन करून याबाबत माहिती दिली होती. ‘उद्या सकाळी भेटते,’ असे मुलींनी सांगितले होते. गुरुवारी (२४ जुलै) सकाळी साडेसात वाजता मुलगी श्वेता घरी आली. तिने दार ठोठावले. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने इतर नातेवाइकांना बोलावले. दरवाजा तोडल्यावर वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आणि आईचा मृतदेह भिंतीला टेकून बसलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह विच्छेदनासाठी सुरुवातीला औंध रुग्णालयात पाठवला. मात्र, राजश्री यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आले.

श्याम वाघेला यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी राजश्री यांचा मृतदेह भिंतीला टेकून बसलेल्या अवस्थेत आढळला असून, त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. दोन्ही मृतदेह शवविच्छेनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर त्यांनी विषप्राशन केले की कसे हे स्पष्ट होईल.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

– संदीप आटोळे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक