पुणे : “वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. अजय तावरे यांची नियुक्ती केली,” असे सांगत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी तावरे यांच्या नियुक्तीचे बिंग फोडले. नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारसपत्र दिले होते. त्या आधारे मुश्रीफ यांनी तावरे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले, अशी कबुलीही डॉ. काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पोर्श मोटार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्याची अदलाबदल केल्याच्या आरोपावर तावरे यांच्यासह आपत्कालीन विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि सफाई कर्मचारी अतुल घटकांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ससून रुग्णालयात झालेल्या रक्ताच्या हेराफेरी, निलंबन आणि गदाराेळाबाबत डाॅ. काळे यांनी ससून रुग्णालयात बुधवारी पत्रकार परिषदेत घेतली त्यावेळी त्यांनी अनेक गाेष्टींचा खुलासा केला. यावेळी वैदयकीय अधीक्षक डाॅ. यल्लपा जाधव, उपअधीक्षक डाॅ. सविता कांबळे, पीएसएम विभागाचे डाॅ. मुरलीधर तांबे, शल्यचिकित्सा विभागाचे डाॅ. पदमसेन रनबागळे आदी उपस्थित हाेते.
टिंगरेंची शिफारस-
डाॅ. अजय तावरे याच्यावर रूबी हाॅल क्लिनिक येथील किडनी रॅकेट प्रकरणी चाैकशी सूरू हाेती, तसेच इतरही आराेप हाेते तरी त्याला आधीचे अधीक्षक किरण कुमार जाधव यांना दूर करून वैदयकीय अधीक्षक पदाची जबाबदारी का दिली गेली? तुमच्यावर काेणाचा दबाव हाेता का? असा प्रश्न विचारला असता यावर डाॅ. काळे म्हणाले की, ही नियुक्ती त्यांच्या मनाने केली गेली नाही. त्यासाठी आमदार टिंगरे यांनी शिफारस केली हाेती आणि मुश्रीफांनी त्यावर घ्या असा शेरा दिल्याने अधीक्षक पद दिले हाेते. त्यानुसार त्यांची ऑर्डर काढण्यात आली.
रक्तचाचणीच्या हेराफेरीबाबत डाॅ. काळे म्हणाले की, पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आराेपी डाॅक्टरने दुसऱ्या बालकाच रक्त काढले. तर आपल्या दाेन डाॅक्टरांना अटक झाल्याची माहीती मला सकाळी साडेनऊ वाजता सध्याचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. यल्लपा जाधव यांनी दिली. त्यानंतर मी अधीक्षकांना सविस्तर माहिती घ्यायला सांगत ती माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाला कळवली आहे.
डाॅ. हळनाेरची सेवा समाप्त :
रक्ताच्या नमुन्यामध्ये हेराफेरी केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर (सीएमओ) डाॅ. श्रीहरी हळनाेर याची सेवा समाप्त करण्यात आली आहे. डाॅ. हळनाेर हा ससूनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी पदावर हाेता. तर, डाॅ. तावरे हा पूर्णवेळ वर्ग एक अधिकारी असल्याने निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवला आहे. सफाई कर्मचारी अतुल घटकांबळे याला निलंबित केले आहे, असेही ससूनचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांनी स्पष्ट केले.
…अन् पत्रकार परिषदेतून घेतला काढता पाय :
ससूनचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे न देता अर्ध्यावरच पत्रकार परिषद आटाेपून काढता पाय घेतला आणि थेट त्यांचा कक्ष गाठला. तसेच त्यांच्या कक्षात काेणी येऊ नये यासाठी त्यांनी बाहेर सुरक्षारक्षकांचा कडा पहारा ठेवला हाेता.