लोकसभेची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी आलेल्या पाच हजार ‘ईव्हीएम’ची (इलेक्ट्रिक वोटिंग मशिन) प्रथमस्तरीय तपासणी सुरू झाली आहे. १० ऑगस्टपर्यंत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही पडताळणी होणार आहे. त्यासाठी बंगळूरवरून २० अभियंते सोलापुरात दाखल झाले आहेत. पक्षांमधील फाटाफाटीमुळे अजूनही अनेक पक्षांचे प्रतिनिधी तेथे उपस्थित राहिलेले नाहीत.






सोलापूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत ३५ लाख ९६ हजार २०६ मतदार आहेत. आता नवीन मतदार नोंदणीसाठी तीन हजार ७०० शिक्षकांची ‘बीएलओ’ (मतदार नोंदणी अधिकारी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नवमतदार नोंदणी, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे कमी केली जात आहेत.
२० ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. शाळेचे कामकाज पाहून त्यांना हे काम करायचे आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर १ जानेवारी २०२४ पासून पुन्हा याच मुद्द्यावर ‘बीएलओं’ना काम करावे लागणार आहे. तत्पूर्वी, निवडणुकीसाठी सोलापुरातील रामवाडी गोदामात ठेवलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, बीयूसीयू या मशिनची तपासणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्राप्त राजकीय पक्षांच्या यादीनुसार पदाधिकाऱ्यांना देखील या तपासणीवेळी उपस्थित राहण्यासंबंधीचे पत्र उपजिल्हा निवडणूक कार्यालयाने दिले आहे. तरीपण, अनेकजण आले नसल्याने त्यांना पुन्हा स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.
१ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांनाही संधी
ज्या विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनीस १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांनीही आता मतदार नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी तहसीलदारांच्या माध्यमातून ‘बीएलओ’ नेमले आहेत, त्यांच्याकडे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘बीएलओं’नी मुदतीत काम करायचे आहे. काहीतरी कारण देवून काम टाळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. ज्यांचे अत्यावश्यक कारण आहे, त्यांनाच ‘बीएलओ’तून वगळले जाते. इतरांना मात्र निवडणूक आयोगाने दिलेली कामे करावी लागतील.
लोकसभा निवडणुकीची तयारी…
एकूण मतदान केंद्रे. ३,७००
निवडणुकीसाठी ‘ईव्हीएम’ ५,०००
बीएलओ ३,७००
मशिन तपासणी २५ जुलै ते १० ऑगस्ट
सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे
बीएलओंनी नवीन मतदार नोंदणी, दुबार, मयत, स्थलांतरित यांचीही नोंद घ्यावी. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. दुसरीकडे सध्या ‘ईव्हीएम’ची प्रथमस्तरीय तपासणी सुरू असून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी रामवाडीच्या गोदामात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत उपस्थित राहावे.
– गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी










