लोकसभेच्या पुढच्या वर्षातील निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कितीही ‘बेटकुळ्या’ फुगवत असला तरी; बारामती, शिरूर या मतदारसंघांत लढण्यासाठी त्यांच्याकडे आजघडीला स्थानिक पातळीवर तगडा उमेदवार नाही. त्यामुळे बारामतीत पवारांची ‘पॉवर’ घालविण्याची भाजप नेत्यांची रणनीती फसणार असल्याचेही उघड आहे.






पण, बारामतीत पवारांना नाकीनऊ आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हरविण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी करीत उमेदवार घडविण्याचा ‘प्लॅन’ केला आहे. त्यातून बारामती मतदारसंघाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार राहुल कुल यांच्यावर तर शिरूरमध्ये समन्वयाची पताका आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर दिली आहे.
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळांना ‘होम पिच’म्हणजेच पुणे लोकसभा मतदारसंघ दिला आहे. या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारीचे पत्ते भाजप मोक्याच्या वेळी काढणार असला; तरी भविष्यात पवारांना टक्कर देण्यासाठी कुल हे मैदानात असतील. शिरूरच्या आखाड्यात लांडगे दंड थोपटण्याची चिन्हे असून, पुण्यात मोहोळ आणखीच चमकू शकतात. याची गोळाबेरीज करूनच भाजपने लोकसभा मतदारसंघांच्या समन्वयकांच्या यादीत मोहोळ, कुल, लांडगेंना स्थान दिल्याचे उघड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १ ऑगस्टच्या दौऱ्यात मोहोळ, कुल, लांडगेंना पुढे आणले जाण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांना तिकिट देण्याची चर्चा होत असला तरी; भविष्यात म्हणजे २०२४ च्या निवडणुकीत मोहोळ उमेदवारांच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर असतील, हेही खरे. लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या भाजपने दीड महिन्यापूर्वी ४८ मतदारसंघात समन्वयकांच्या नेमणुका केल्या. त्यात आमदार, खासदार आणि संघटनेतील पदधिकाऱ्यांना सामावून घेतले आहे. ही जबाबदारी वाटताना भविष्यातील निवडणुका, त्यातील आव्हाने, तेव्हाचे ताकदीचे उमदेवार, हे बारकाईने तपासूनच नेत्यांना निवडले गेले आहे. समन्वय हे संभाव्य उमेदवार असल्याचेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.
लोकसभेच्या तीन निवडणुकांपासून म्हणजे २०१४, २०१९ आणि आता २०२४ साठी ‘मिशन बारामती’आखले आहे. बारामतीत पवारांना हरवनू करिष्मा दाखविण्याची भाजपची धडपड आहे. मागील निवडणुकीत तर ‘बारामती जिंकल्यानंतरच राज्य जिंकल्यासारखे असेन’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बोलून दाखविले होते. त्यानंतर आताही बावनकुळे हे बारामतीवर चाल करण्याची भाषा करीत आहेत. मात्र, या पक्षाकडे स्थानिक पातळीवर ताकदीचा उमेदवार नसल्याने पवारांना ‘शॉक’ देण्यासाठी पुन्हा ‘कुल’ हे अस्त्र वापरले जाऊ शकते.
ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर शिरूरमध्ये भाजपचा विस्ताराचा प्रयत्न आहे. या मतदारसंघातूनही लढण्याचा भाजपचा इरादा आहे. त्यासाठी भाजपमधील ‘ताकदवान’ आमदार महेश लांडगेंना शिरूरमध्ये लढविले जाऊ शकते. तसे लांडगेंनाही खासदार व्हायचेच असून त्यांना मावळाऐवजी शिरूरचा पर्याय दिला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
बापट यांच्यानंतर पुण्यात भाजपला नवा, आश्वासक हवाच आहे. त्यात मोहोळ आजघडीला तरी उजवे ठरत आहेत. महापालिकेच्या राजकारणातून राज्याच्या राजकीय वर्तुळात भाजपचा चेहरा होऊ पाहणाऱ्या मोहोळांच्या मनात लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहेच. त्यामुळे नव्या राजकारणात बारामतीतून कुल, शिरूरमधून लांडगे आणि पुण्यातून मोहोळ दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहेत. या तिघांना मोदींच्या दौऱ्यांत जाणीपूर्वक केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न होईल.











