पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे खाजगी सावकाराने पतीसमोर पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सावकाराने पत्नीवर अत्याचार करताना तिच्या पतीला समोरच बसवून ठेवलं होतं. त्यानंतर आरोपी सावकाराने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.






मिळालेल्या माहीतीनुसार पुण्यातील हडपसर भागामध्ये फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. पण ती 34 वर्षीय पीडित विवाहितेच्या तक्रारीनंतर आता ही घटना समोर आली आहे. तिच्या फिर्यादीनुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या पतीला आरोपी इम्तियाज हसीन शेख याने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले पैसे महिलेचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवत आरोपीने त्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.
त्यानंतर या संपूर्ण घटनेचा आरोपीने व्हिडिओ देखील बनवला होता. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी इम्तियाज हसीन शेख याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
हा प्रकार समजताच पीडितेने हडपसर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.












