हनीट्रॅप सुरूच! मंत्रालय कर्मचारी ‘अंजली’च्या जाळ्यात; G20 परिषदेच्या फाईल्स केल्या शेअर

0

सध्या प्रदीप कुरुलकर यांचं हनीट्रॅप प्रकरण देशात गाजत असतानाच, परराष्ट्र मंत्रालयाचा एक कर्मचारी देखील अशाच प्रकारच्या ट्रॅपमध्ये अडकला असल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील हे प्रकरण आहे. या कर्मचाऱ्याने G20 परिषदेशी संबंधित काही गोपनीय फाईल्स एका ऑनलाईन फ्रेंडला पाठवल्याचं समोर आलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आऊटसोर्सिंग करून जे कर्मचारी तैनात केले होते, त्यांपैकीच एक हा कर्मचारी आहे. नवीन पाल असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. १२वी पास नवीन एमटीएस पदावर कार्यरत आहे. नवीन हा अज्ञात व्यक्तीला गोपनीय डॉक्युमेंट्स पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

यानंतर तपासात पोलिसांना नवीनकडे एक आयफोन आढळून आला. या आयफोनमध्ये G20 परिषदेशी संबंधित डॉक्युमेंट्सचे फोटो दिसून आले. या सर्व डॉक्युमेंट्सवर ‘सीक्रेट’ असं लिहिलं होतं. याव्यतिरिक्त काही डॉक्युमेंट्सचे स्क्रीनशॉट देखील मिळाले. हे सर्व फोटो त्याने ‘अंजली कलकत्ता’ नावाने सेव्ह असलेल्या एका नंबरवर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर केले होते. पोलिसांनी जेव्हा नवीनची बँक हिस्ट्री तपासली, तेव्हा त्याच्या खात्यावर अज्ञात व्यक्तीने आतापर्यंत ८५ हजार रुपये भरल्याचं दिसून आलं. यामुळे, नवीन या गोपनीय फाईल्स विकत असल्याचं स्पष्ट झालं.

‘अंजली’ने लावलं गळाला

मिळालेल्या माहितीनुसार, नवीनची सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजली नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी नंबर एक्सचेंज करून व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू केली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. अंजलीने आपण कोलकातामध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

ISI एजंट असल्याची शक्यता

अंजली नावाची ही तरुणी कोलकाता नाही, तर पाकिस्तानची रहिवासी असू शकते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, ती आयएसआय एजंट असण्याची शक्यताही असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सध्या नवीनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर तपास यंत्रणा याबाबत अधिक चौकशी करत आहेत.