राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल रात्री पुन्हा एकदा उशीरा बैठक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सलग दुसऱ्या दिवशी ही बैठक पार पडली. तब्बल दोन तास ही बैठक चालली आहे.
या रात्रीच्या बैठकीमध्ये मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप या संदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, काल देखील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली होती. तर ही बैठक तब्बल 3 तास चालली होती. दरम्यान या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे.
तिन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबतचे प्रश्न सुटले आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.
तर आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या गटाकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जात असल्याची चर्चा आहे. अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती आहे.