अमित शहांचा महिन्याभरातच दुसरा महाराष्ट्र दौरा; मुख्यमंत्रीही स्वागताला जवळीकतेची चर्चाही सुरू

0

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी रात्री नागपूरमध्ये येणार आहेत. एका महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. मंगळवारी पोलिस आय़ुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

मुंबई दौऱ्यानंतर आता अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. एकाच महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. यामध्ये ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन करणार आहेत. बुधवारी रात्री अमित शहा नागपूरमध्ये पोहोचतील. पक्षीय बैठकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा रात्री नागपूरमध्ये पोहोचणार असल्याची माहिती समजते. अमित शहांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंसोबत त्यांच्या जवळीकतेची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अमित शहांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा

अमित शहा वर्धा रोडवरील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबणार आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीडीडीएसकडून एनसीआय परिसरात तपासणी केली जात आहे. तसंच पोलिसांची बुधवारी घेराबंदीही असेल.

अमित शहांसाठी स्पेशल बुलेटप्रूफ वाहनही नागपूरला आले आहे. पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेलीय. २ डीसीपी बाहेरून बोलावण्यात आले आहेत. तर ५० पोलिस निरिक्षक आणि १५० पोलीस उपनिरीक्षक, २ हजार पोलीसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी असणार आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना इतर मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार