राज्यात उशीरा दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना जुलै महिन्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पडलेला पाऊस जुलै महिन्यात सरासरी गाठेल, तर राज्यातील बहुतांश बागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज शुक्रवारी (ता. ३०) जाहीर केला. जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात देशात सरासरी १६५ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा जून अखेर सरासरी १४८.६ मिलीमीटर म्हणजेच ९० टक्के पाऊस झाला आहे.’’ जुलै महिन्यात यंदा राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जून महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्यानंतर जुलै महिन्यातील चांगल्या पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे.
मध्य भारतासह लगतच्या दक्षिण द्वीपकल्प, पूर्व भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर वायव्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील नोंदीनुसार जूलै महिन्यात देशात २८०.४ मिलीमीटर पाऊस पडतो.
एल-निनो होतोय विकसित –
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सध्या एल-निनो स्थिती विकसित होत असून, मॉन्सूनच्या हंगामाच्या मध्यावर एल-निनो स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहे. ही स्थिती मार्चपर्यंत कायम राहण्याचे शक्यता आहे. हिंद महासागरात सर्वसाधारण इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती असून, उर्वरित मॉन्सून हंगामात धन (पॉझिटीव्ह) आयओडी स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जूनमध्ये निम्माच पाऊस –
पुण्यात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे पावसाला सुरवात झाली खरी, पण जून महिन्याची सरासरी गाठण्यास त्याला अपयश आले आहे. अपेक्षीत १५२ मिलिमीटर पैकी फक्त ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ७० मिलिमीटरची तूट बाकी आहे. पुढील आठवड्यातही शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर रविवार (ता.२) पर्यंत शहरात अकाश सामान्यतः ढगाळ आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.