मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जून २०२७ पर्यंत साडेसाती असून तोपर्यंत त्यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे, मात्र, जून २०२७ नंतर फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असून, केंद्रातील राजकारणामध्ये फडणवीस यांचे महत्त्व वाढू शकते. आगामी काळात पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत फडणवीस यांचे अग्रक्रमाने येण्याची शक्यता वाटते, असे पुण्यातील ज्योतिष सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितले. या आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७०चा असून, त्यांची कुंभ रास आहे. या राशीला साडेसाती असून, साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. मागील पाच वर्षे साडेसाती सुरू असून, याच काळामध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. २०१४ ते २०१९च्या तुलनेत २०२४नंतर त्यांना मिळालेले मुख्यमंत्रिपद त्यांच्यासाठी कटकटीचे ठरले आहे. पक्षाला आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असूनही, महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे, असे मारटकर म्हणाले.
सध्या साडेसातीशिवाय मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण कुंभ राशीच्या अष्टमातून सुरू असल्यामुळे मराठा आंदोलनाला सामोरे जाताना मोठी हतबलता दिसून येत आहे. मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण १३ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरपर्यंत काळ मुख्यमंत्र्यांसाठी कटकटीचा ठरणार आहे. पण त्याचबरोबर सात सप्टेंबरचे चंद्रग्रहण आणि २१ सप्टेंबरचे सूर्यग्रहण मुख्यमंत्री व महाराष्ट्रासाठी प्रतिकूल राहू शकते.
महाराष्ट्राची धनू रास असून, कन्या राशीचा मंगळ दशमात भ्रमण करीत असल्याने महाराष्ट्र व विशेषतः मुंबईमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. या प्रतिकूल ग्रहणाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर होण्याची शक्यता आहे. सात ते २१ सप्टेंबर या काळात मोठ्या घटना महाराष्ट्रामध्ये अनुभवास येतील. याची तीव्रता १५ ऑक्टोबरपर्यंत राहू शकते. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सात सप्टेंबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून, दशम स्थानात कुंभ राशीत पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. दशमात चंद्र राहू, चतुर्थात रवी-केतू बुध, लग्नी हर्षल, धनस्थानी गुरू, तृतीयात शुक्र, पंचमात मंगळ व लाभस्थानी शनी नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता राहूयुक्त पौर्णिमा दशमात होत असून, लाभातील शनी-नेपच्यून योगामुळे राजकीय क्षेत्रात मोठे गोंधळ व नाट्यमय घटना होण्याची शक्यता वाटते.











