बालपण, तारुण्य यापलीकडे जाऊन प्रौढत्व जगणारी माता म्हणजे त्यागमूर्ती रमाई – बौद्धाचार्या साक्षी प्रमोद मोरे

0

मुंबई दि. ३ (रामदास धो. गमरे) “बुद्धांने आपल्याला जन्मपासून मृत्यूपर्यंत एक सिद्धांत दिला आहे त्यानुसार तुमचं बालपण, तारुण्य, प्रौढत्व ते महापरिनिर्वाण पर्यंत आपण जगत असलेली जीवनात तुम्हाला उंच शिखर गाठायचं असेल व आदर्श जीवनपद्धत अवलंबायची असेल तर आपलं मन समाधानी, शांत व स्थिर असलं पाहिजे तरच आपण उंच शिखर गाठू शकतो, बुद्धांच्या याच सिद्धांताला अनुसरूनच माता रमाईनी आपला जीवनप्रवास केलेला आहे, संपूर्ण आयुष्य खडतर जीवन जगण्यात घालवलेल्या रमाईचे आई-वडील भिकू धोत्रे व आई रुक्मिणी धोत्रे यांनी वलंगकर नाव धारण केल होते, आई रुक्मिणी हिने लहानग्या रमाईवर चांगले संस्कार केले दुपारच्या वेळी माय लेक गप्पा मारत बसत त्यावेळी आई रुक्मिणी म्हणत असे रमा लवकरच तुझं लग्न तू दुसऱ्याच्या घरी जाणार आहेस म्हणून त्या सुखी संसार कसा करावा, कुटुंबात कसे राहाव, कस वागावं याचे धडे सातत्याने रमाला देत असत, रमाईचे वडील भिकू धोत्रे (वलंगकर) हे मच्छीच्या पाट्या वाहून नेने आदी जड कष्टकरी कामे करीत त्यामुळे त्यांना छातीचा आजार बळावला होता त्यातच रक्ताच्या उलट्या ही झाल्या होत्या त्यांच्या तब्येतीच्या काळजीने रुक्मिणी आतून झुरत होत्या त्यामुळे त्यांचीही तब्येत खालावत चालली होती सोबतच रमाच्या वडिलांची तब्येत ही नाजूक असल्याने आपल्या मुलांच्या डोक्यावरच पितृछत्र हरपेल की काय ह्या विचाराने ही आई रुक्मिणी खंगल्या होत्या, शेवटी नियतीने घाला घातलाच एक आईच्या अचानक जाण्याचे दुःख रमासाठी मोठा आघात होता तरी आपली लहान भावंडांना बघून तिने स्वतःला सावरले आईच्या मागे आपली तीन भावंडे व वडिलांचा तिने आईच्या मायेने सांभाळ केला, रुक्मिणीच्या अचानक जाण्याने भिकू धोत्रे ही खालावले होते अंतिम क्षणी त्यांनी रमा व तिच्या भावंडांना जवळ बोलवलं व सांगितले की ‘रमा तुझ्या आई नंतर तू मला व तुझ्या भावंडाना आईच्या मायेनं सांभाळलं आता माझा ही शेवट आला आहे तरी या तुझ्या तिन्ही भावंडांना सांभाळ’ वडीलांच्या नंतर रमाने लहान भावंडांना सांभाळलं, लग्नानंतर बाबासाहेबांना त्यांनी आपल तन मन धन अर्पण केल, त्याना साथ दिली, त्यांच्या संसाराचा गाडा समर्थपणे ओढला, वेळप्रसंगी उपाशी राहून, गौऱ्या विकून बाबासाहेबांच्या मागे हिमलयासारखी उभी राहिली, बाबासाहेबांची सामाजिक, राजकीय कारकीर्द बहरावी याकरता त्यांनी आपल्या वैवाहिक सुखाचा ही त्याग केला, आपल्या चार मुलांना मातीआड करूनही तिने नऊ कोटी लेकरांच भविष्य लिहिण्यासाठी बाबासाहेबांना साथ दिली, आपल्या प्रत्येक सुखाचा त्याग करून केवळ कुटुंब हेच आपलं सुख म्हणूनच बालपण, तारुण्य, प्रौढत्व जगणारी माता म्हणजे त्यागमूर्ती रमाई होय” असे प्रतिपादन बौद्धजन पंचायत समिती आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प गुंफत असताना साक्षी प्रमोद मोरे यांनी केले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत प्रस्ताविक सादर केले प्रास्ताविक सादर करताना त्यांनी स्मारकाच्या निधी करता बौद्धाचार्य, बौद्धाचार्यांना, बौद्ध धम्म अनुयायी यांनी सढळ हस्ते मदत करीत ऑक्टोबर पर्यंत जमा करावे असे आवाहन केले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अध्यक्षीय भाषणात उपसभापती विनोद मोरे यांनी “व्याख्यात्या साक्षी मोरे यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांची जीवनगाथा सादर करताना उदाहरणांसह जी मांडणी केली ती हृदयस्पर्शी आहे साक्षी मोरे एकएक मुद्दा मांडताना अक्षरशः उपस्थितांचे डोळे पाणावले होते असे विचार त्यांनी मांडले, माता रमाई बुद्धाच्या सिद्धांतानुसार आपलं जीवन जगल्या तोच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगले पाहिजे” असे मार्गदर्शन केले.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, विठ्ठल जाधव, यशवंत कदम, सिद्धार्थ कांबळे, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, महेंद्र पवार, सिद्धार्थ कांबळे, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.